शाळा अन् कॉलेजसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात दाखवा 'छावा'; शिंदेंच्या आमदाराचं CM फडणवीसांना पत्र
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित "छावा" हा चित्रपट 50% सवलतीने प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) जीवनावर आधारित छावा (Chhaava) सिनेमा सध्या चर्चेत आहे. तसेच, संभाजी महाराजांचे त्याग, बलिदान आणि शौर्याची गाथा म्हणजे हा सिनेमा. त्यामुळे, प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक शिवप्रेमींना हा सिनेमा पाहायलाच हवा असा सूर निघत आहे. त्या दृष्टीने शिवप्रेमींकडून आवाहन देखील केलं जात आहे. तर, हा सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. मात्र, हा सिनेमा टॅक्स फ्री करता येणार नाही, कारण राज्य सरकारकडून 2017 पासून चित्रपटांवर करमणूक कर लावलाच जात नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर, आता महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किरण सामंत (Kiran samant) यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेगळीच मागणी केली आहे. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलतीच्या दरात हा सिनेमा दाखवला जावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित "छावा" हा चित्रपट 50% सवलतीने प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित "छावा" हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आला असून, महाराष्ट्र किंबहुना भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा पैलू चित्रपटाद्वारे मांडण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे नेतृत्व, शौर्य आणि बलिदान तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाबद्दल या चित्रपटाद्वारे जगासमोर दाखविण्यात आली आहे. त्यामुळे, या चित्रपटाला शिवभक्त आणि शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळत असून चित्रपटगृहात गर्दी होत आहे. या सिनेमातील काही दृश्य पाहून शिवप्रेमींना अक्षरश: रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. तसेच, लहानपणी आम्हाला शाळेत हा इतिहास का शिकवला नाही, असा सवालही उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे माजी क्रिकेटर आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने ट्विटरवरुन हा सवाल उपस्थित केला होता. आता, छावा सिनेमाच्या माध्यमातून हा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा म्हणून विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलतीत हा सिनेमा दाखवण्यात यावा, अशी मागणी महायुतीमधील आमदार किरण सामंत यांनी केली आहे.
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल जागरुकता आणण्याकरिता सदरचा चित्रपट 50% सवलतीने दाखविल्यास शासनाचे महत्वाचे योगदान ठरेल. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून, त्यांनी महाराष्ट्र व देशाचा इतिहासात अत्यंत महत्वाचे योगदान दिले असल्याने, त्यांच्या जीवनावर आधारित "छावा" हा हिंदी चित्रपट शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 50% सवलतीने दाखविणेबाबत निर्णय घेण्यात यावा, ही विनंती, अशा आशयाचे पत्र आमदार किरण सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे, छावा सिनेमा टॅक्स फ्री करता येणार नाही, असे म्हटलेल्या मुख्यमंत्र्यांकडून आता ह्या नव्या मागणीवर विचार होणार का, हे पाहावे लागेल.
हेही वाचा
ज्वारीच्या कडक भाकरीवर छत्रपती शिवराय; महाराजांची अफलातून कलाकृती, पाहा फोटो...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
