धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
गोळीबाराच्या घटनेत कार्यालयातील तीनजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून भाजपचे माजी आमदार कुंवर प्रणव यांनीच हा गोळीबार केल्याचा आरोप स्थानिकांना केला आहे.
डेहरादून : दोन राजकीय नेत्यांमधील वाद ही नवी बाब नाही, पण गेल्या काही वर्षांत राजकीय वादांतून टोकाची भूमिका उचलली जात असल्याचे पाहायला मिळाले आहे. गतवर्षी भाजपच्या कल्याणमधील तत्कालीन आमदाराने चक्क पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. आता, उत्तराखंडमध्येही अशीच एक घटना घडली असून भाजपच्या (BJP) माजी आमदाराने विद्यमान आमदाराच्या संपर्क कार्यालयावरच गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. माजी आमदार कुंवर प्रणव यांनी आमदार (MLA) उमेश कुमार यांच्या कँप कार्यालयात गोळीबार केला. कुंवर प्रणव यांचा गोळीबार (Firing) करतानाचे फोटो व्हायरल झाले असून येथे अनेक गोळ्या चालवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. रुडकी मतदारसंघातील अपक्ष आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या गोळीबार केल्याची घटना घडली आहे. तसेच, या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे.
गोळीबाराच्या घटनेत कार्यालयातील तीनजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून भाजपचे माजी आमदार कुंवर प्रणव यांनीच हा गोळीबार केल्याचा आरोप स्थानिकांना केला आहे. खानपूर मतदारसंघातून कुंवर प्रणव सिंह चॅँपियन हे आमदार राहिले आहेत. दरम्यान, येथील कार्यालयात कुंवर प्रणवसिंह यांनी एका युवकासोबत मारहाण देखील केली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांकडून तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत आहे. याप्रकरणी, गढवालचे आयजी राजीव स्वरुप यांनी माहिती देताना म्हटले की, हे घटनेची माहिती घेत असून एसएसपींना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये पूर्ववैमन्यस्यातून वाद आहे. गत विधानसभा निवडणुकीत उमेश कुमार यांनी अपक्ष निवडणूक लढवत प्रणव सिंह यांचा पराभव केला होता. त्यातच, आता गोळीबाराच्या घटनेनंतर हा वाद आणखी चिघळत चालला असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये सोशल मीडियावरही वॉर
गोळीबाराच्या घटनेनंतर मतदारसंघात तणावाचं वातावरण असून सोशल मीडियावर देखील दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून पोस्टरबाजी केली जात आहे. उमेश कुमार यांनी पोस्ट करत भाजप नेत्याला खुले आम चॅलेंज केलं आहे. तर, प्रणव सिंह चँपियन यांनीही आपल्या समर्थकांना एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे. नेतेमंडळीतील ह्या वादाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होताना दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे, पोलीस प्रशासनाने तातडीने हे प्रकरण मार्गी लावावे, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, पोलीस प्रशासन व सरकारवर दबाव वाढला असून शांतता प्रस्थापित करण्याचं आव्हान आहे.