अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत अनधिकृतपणे वास्तव करणाऱ्या नागरीकांची शोध मोहिम अधिक तीव्र केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नालासोपारा येथून 9 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या आणि अवैध रीतीने देशात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात (Bangladeshi) त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान या निर्देशानंतर राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
अशातच, सध्या मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत अनधिकृतपणे वास्तव करणाऱ्या नागरीकांची शोध मोहिम अधिक तीव्र केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नालासोपारा पूर्वेकडील, भागवत बिल्डिंग, गांगडीपाडी, धानीव बाग येथे परदेशी नागरीक अनधिकृतपणे वास्तव्य करीत असलेल्या 9 बांगलादेशी (Bangladeshi) नागरीकांचा शोध घेवून त्याच्यावर पेल्हार पोलिसांनी कारवाई केली आहे.
9 बांगलादेशींची धरपकड करत कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे, नालासोपारा पूर्वेकडील, भागवत बिल्डिंग, गांगडीपाडी, धानीव बाग येथे पोलिसांनी शोध मोहिम राबवल्यानंतर तेथे 7 महिला आणि 2 पुरुष संशयितरित्या वास्तव करताना आढळून आले. त्यांची तपासणी केल्यावर त्यांनी आपण बांगलादेशी असल्याचे कबूल केलंय.
दरम्यान तेथील गरीबी आणि उपासमारीला कंटाळून आपण भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून इसामोती नदी पार करुन, हकिमपुर गांव, 24 परगणा, पश्चिम बंगालमार्गे पश्चिम बंगाल हावडा येथून रेल्वे मार्गे मुंबईला आल्याची कबूली दिली. सध्या पेल्हार पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाईला सुरुवात केली आहे.
भिवंडीत बांग्लादेशींचा जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे की भिवंडी तालुक्यात हजारों बांग्लादेशी (Bangladeshi) रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या मते, महाराष्ट्रात तब्बल दोन लाख रोहिंग्यांनी असे अर्ज सादर केले असून काही दाखल्यांची चौकशी पूर्ण झाली आहे, तर अनेकांची तपासणी अद्याप बाकी आहे. महापोली, पडघा, बोरिवली, आणि खोणी या गावांतील काही ग्रामपंचायतींवर बेकायदेशीर पद्धतीने जन्म प्रमाणपत्रे देण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर पुढील दोन दिवसांत कारवाई केली जाईल, असे सोमय्यांनी ठामपणे सांगितले आहे.