एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली, पालकमंत्री झाले मात्र तीन जणांचे सरकार असल्यामुळे थोड्या कसरती सरकारमध्ये आल्या आहेत.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं, त्यात 132 जागांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे, साहजिकच मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाईल हेच राजकीय तज्ज्ञ सांगत होते. त्यानुसार, भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असं ठरल्यानंतर माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज झाल्याची चर्चा होती. त्यातच, मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंबाबत मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्यास सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, आपण सत्तेत असले पाहिजे असं आम्ही सर्व आमदारांनी त्यांना समजावले. तेंव्हा ते उपमुख्यमंत्री पदासाठी तयार झाल्याचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले. त्यामुळे, आपण नाराज नाही असं म्हणणारे एकनाथ शिंदे हे नाराज होते हेही स्पष्ट झाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील, उपमुख्यमंत्रीपदासाठी आपणच एकनाथ शिंदेंची समजूत काढल्याचे म्हटले होते.
सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली, पालकमंत्री झाले मात्र तीन जणांचे सरकार असल्यामुळे थोड्या कसरती सरकारमध्ये आल्या आहेत. पण, आपल्या आशीर्वादाने पुन्हा चौथ्यांदा मला शपथ घेण्याची संधी मिळाली. मंत्री होण्यामध्येही यावेळी फार कसरत होती, मागच्यावेळी 4.2% मध्ये एक मंत्री होता. म्हणजे 4आमदार असलेल्या पक्षामागे एक मंत्री होता. मात्र, मेजॉरिटी यावेळी 7.2 टक्के आल्याने मी देखील मंत्री होईल किंवा नाही याची गॅरंटी मला नव्हती, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंनी आमचा मान ठेवला
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्यासाठी नकार दिला, त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या. आम्ही त्यांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे. कारण, एकनाथ शिंदे या नावाने सध्याचं महायुती सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती. त्यामुळेच, तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस हे आपल्या काळात उपमुख्यमंत्री होते, त्यांनीदेखील मोठे मन दाखवलं होतं. आपण सुद्धा यावेळेस मोठे मन दाखवलं पाहिजे आणि उपमुख्यमंत्री पद घेतलं पाहिजे, अशी विनंती आपण एकनाथ शिंदेंना केली होती. आपल्या सर्व आमदारांचा एकनाथ शिंदे यांनी मान ठेवला, असा खुलासाच गुलाबराव पाटील यांनी केला.
तीनवेळा पालकमंत्रीपदाची संधी मिळणारा मी एकमेव
ज्या माणसाला पद द्यायचे असतात त्याला किती टेन्शन असतं हे सर्वांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला तिसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्येही पाणीपुरवठा आणि शिंदे साहेबांच्या सरकारमध्येही पाणीपुरवठा खाते माझ्याकड़े होते. आता, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही पाणीपुरवठा अशी संधी मिळणारा मी पहिला मंत्री असेल, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. सेकंड फेजमध्ये जिल्ह्यात पालकमंत्री होणं हीदेखील जिल्ह्यात पहिलीच वेळ असेल. आपण निवडून येणार अशी काही परिस्थिती नव्हती. मात्र, जेव्हा रॅलीमध्ये आम्ही फिरलो तेव्हा मला आत्मविश्वास होता आपण निवडून येऊ, असेही पाटील म्हणाले.