पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यातील राजगुरुनगरमध्ये मार्केटिंगचा अनोखा फंडा दुकानदाराच्या अंगलट आला आहे. कारण, या फंड्यापायी दुकान बंद करण्याची वेळ दुकानदारावर आल्याचं पाहायला मिळालं.
पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्याची ओळख आता होलसेल मार्केटचं शहर अशीही झाली आहे. उद्योग विश्वातही पुणे (Pune) शहराचं नाव देशपातळीवर पोहोचलं असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून होलसेल खरेदीसाठी ग्राहक येथे गर्दी करतात. अनेक दुकानदार पुण्यातून खरेदी करुन गावी विक्री करण्याचाही व्यवसाय करतात. याशिवाय पुण्य नगरीत सातत्याने वेगवेगळ्या ऑफर्संही सुरू असतात. त्यात, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्तानेही मोबाईलसह कपड्याच्या दुकानांतही अनेक ऑफर्संचे बोर्ड शहरात झळकले आहेत. दरम्यान, पुण्यातील राजगुरुनगर येथे केवळ 1 रुपयांत ड्रेसची (Clothes) ऑफर सुरू केलेल्या दुकानादारावर चक्क दुकान बंद करण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळालं. या ऑफरमुळे दुकानाबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. त्यामध्ये, महिलांची संख्या लक्षणीय होती. मात्र, गर्दी आटोक्यात न आल्याने पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
पुण्यातील राजगुरुनगरमध्ये मार्केटिंगचा अनोखा फंडा दुकानदाराच्या अंगलट आला आहे. कारण, या फंड्यापायी दुकान बंद करण्याची वेळ दुकानदारावर आल्याचं पाहायला मिळालं. प्रजासत्ताक दिनानिमित्त एका कापड दुकानादाराने 1 रुपयांमध्ये 1 ड्रेस अशी खास महिलांसाठी ऑफर ठेवण्यात आली होती. त्यामुळे, वाऱ्याच्या वेगाने व सोशल मीडियातून ही ऑफर घराघरात पोहचली. त्यानंतर, या ऑफरचा फायदा घेण्यासाठी महिलांची राजगुरुनगरमध्ये एकच झुंबड उडाली. मात्र, अनपेक्षित गर्दी पाहून दुकानदाराने चक्क दुकानच बंद करण्याचा निर्णय घेतला. पण, केवळ 1 रुपयामध्ये कपडे न घेण्याच्या अपेक्षेने आलेल्या महिलांनी दुकान बंद होताच संताप व्यक्त केला. येथे महिलांनी राजगुरुनगर आणि भीमाशंकर मार्गावर गर्दी केली होती, परिणामी या मार्गावर मोठी कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं. कारण, दुकानदाराने 1 रुपयांत कपडे न दिल्यास दुकान तोडून कपडे घेणार, अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतली होती. त्यामुळे येथे पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली.
रस्त्यावरील मोठी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी झाल्याने 1 रुपयांत ड्रेसच्या ऑफर्सची बातमी पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचली. अखेर घटनास्थळी खेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. या कर्मचाऱ्यांनी महिला व दुकानदार यांच्यात हस्तक्षेप करत वाद संपुष्टात आणल्याचे दिसून आले. दरम्यान, सकाळपासून दुकानदाराने 1 रुपयांत नियम व अटींसह ड्रेसची विक्री केल्यानंतर दुपारच्या सुमारास दुकानाबाहेर मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे, अखेर दुकानाला कुलूप लावायची वेळ दुकानदारावर आली.
हेही वाचा
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके