(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Coastal Road: मुंबईतील कोस्टल रोडचं काम महिनाभर लांबणार, एप्रिल महिन्यात पूर्ण होणार बोगद्याचे काम
Mumbai Coastal Road: कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये बोगदा खोदणाऱ्या मावळा टनेल बोरिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काम पूर्णपणे थांबले होते.
मुंबई : मुंबई महापालिकेचा (BMC) महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रोजेक्टचे (Coastal Road Project) काम महिनाभर लांबणार आहे. बोगदा खोदणाऱ्या मावळा टनेल बोरिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोस्टल रोडच्या बोगद्याचा काम पूर्ण होण्यास एक महिना उशीर होणार आहे. त्यामुळे बोगद्याचे काम पूर्ण करण्याची मार्च महिन्यातील डेडलाईन हुकणार आहे.
कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये बोगदा खोदणाऱ्या मावळा टनेल बोरिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काम पूर्णपणे थांबले होते. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून हे मशीन पुन्हा एकदा काम करत आहे. या तांत्रिक बिघाडामुळे गिरगाव ते प्रियदर्शनी पार्क यादरम्यान दोन किलोमीटरच्या बोगद्याचे काम जवळपास एक महिना लांबणीवर पडणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस या बोगद्याचे काम पूर्ण होणार होते. आता एप्रिल महिन्यात या बोगद्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रियदर्शनी पार्क ते वरळी सीलिंग दरम्यान 10.58 किमी कोस्टल रोड बनवण्यात येत आहे. दरम्यान, एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे काम 72 टक्के पूर्ण झाले आहे. कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे दक्षिण भाग आणि उत्तर भाग. यामध्ये दक्षिण भागाचं काम अगोदर हाती घेतले आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान, जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे. जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून वरळी-वांद्रे सीलिंकपर्यंत आहे.
कसा असणार मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?
- मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल
- दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीला असून प्रकल्पाचा 70 टक्के काम पूर्ण झाले
- प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंत दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प असेल
- एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे
- यामध्ये 15.66 किमी चे तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल
- कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत आणि 34% इंजिन बचत होईल ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल
नोव्हेंबर 2023 जर या प्रकल्पाची डेडलाईन असली तरी याआधी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी प्रत्येक मुंबईकरांची अपेक्षा असणार आहे. कारण मुंबईच्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून कोस्टल रोड प्रोजेक्ट हा माइल स्टोन ठरणार आहे. सोबतच देश पातळीवर दर्जेदार रस्त्यांसाठीचा एक उत्तम उदाहरण बनणारा आहे आणि अर्थातच त्यामुळे आपल्या मुंबईचा रूपड पालटणार यात शंका नाही.