पंजाबी तंदुर रोटी हा खवय्यांचा आवडता पदार्थ झाला आहे.
धाब्यावरील कोळशा भट्टीतील तंदुर रोटी चवीने खाल्ली जाते.
आता यापुढे कोळसा भट्टीतील तंदुर रोटी मुंबईकरांना खाता येणार नाही.
कारण, कोळसा तंदुर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
कोळसा तंदुर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरण वापर करण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्या आहेत.
मुंबईतील एकही बेकरी आता जळाऊ लाकडावर चालणार नाही त्याऐवजी सिएनजी, पीएनजी वापरावे असे आदेशच आयुक्तांनी सर्व बेकरी चालक, रेस्टॉरंट आणि धाबा चालकांना दिल्या आहेत.
हॉटेलचालकांनी 8 जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाईल. असा इशाराही या नोटीसमधून सर्वच व्यवसायिकांना देण्यात आला आहे.
9 जानेवारीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेतच्या हद्दीत लाकूड, कोळसा किंवा इतर पारंपारिक इंधन वापरणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना सूचना देण्यात आली आहे.
आतापर्यंत 84 ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि तंदूर आस्थापनांना मुंबई महापालिकेकडून याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबईत रेस्टॉरंट, बेकरी आणि धाबाचालकांची संख्या 1 हजारांच्या पुढे असावी, त्यातील बहुतांश चालक हे विद्युत उपकरणाचा वापर करतात. मात्र, अनेकजण अद्यापही जुन्याच पद्धतीचा सर्रासपणे कोळशा भट्टीचाच वापर करतात.
त्यामुळे मुंबई महापालिकेनं याची दखल घेत सक्तीने संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत.