बँकेच्या कर्जवसुलीच्या तगाद्यानं शेतकऱ्यानं केली आत्महत्या, अकोला जिल्ह्यातील वाई गावातील घटना
Akola News : डोक्यावर वाढलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आपलं शेत जाणार या भीतीने गवळे यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.
अकोला : अकोला (Akola News) जिल्ह्यात सोयाबीन, तूर उत्पादक शेतकऱ्याने त्याच्याच शेतात कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. किशोर श्रीराम गवळे असं या 48 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तो मुर्तिजापूर तालुक्यातील वाई गावाचा रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना बँकेकडून कर्जवसुलीसाठी नोटीस जारी करण्यात आली होती. डोक्यावर वाढलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आपलं शेत जाणार या भीतीने गवळे यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. दरम्यान या प्रकरणी माना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातल्या वाई गावातील रहिवासी किशोर श्रीराम गवळे यांच्याकडे चार एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी बँकांकडून पीक कर्ज घेतले होते. मात्र, अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेल्या नापिकीमुळे गवळे हे मोठ्या संकटात सापडले. त्यात बँकेचं कर्ज आणि त्याचं व्याजही वाढत गेले. काही दिवसांपूर्वी त्यांना बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस मिळाली. सात दिवसांच्या आत कर्जाची रक्कम भरण्यात यावी, अन्यथा न्यायालयाद्वारे तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, आणि अशा परिस्थितीत खटल्यातील खर्च आणि परिणामांसाठी पूर्णपणे जबाबदार राहणार असल्याचं नोटीशीत म्हटलं होतं. या नोटीसनंतर गवळे तणावात होते. या तणावातून त्यांनी शेती विकण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात त्यांनी पत्नी आणि मुलाशीही चर्चा केली, मात्र दोघांनीही शेती विकण्यासाठी त्यांना नकार दिला, अन् दुसरा पर्याय बघू, अशा चर्चा झाल्या. परंतु गवळे यांनी याच तणावात आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यांनी स्वतःच्या शेतात कीटकनाशक विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं. या प्रकरणात मुर्तीजापुर तालुक्यातल्या माना पोलिसांनी आकस्मिक मूर्तीची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. डोक्यावर वाढत्या कर्जामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गवळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या आत्महत्येनं गावात सर्वांना धक्का बसलाय.
नेमकं काय आहे नोटीसमध्ये?
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून मिळालेल्या नोटीसमध्ये नमूद आहे की, आपण 50 हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. तसेच 88 हजार रूपये, 83 हजार 726 रूपये आणि 89 हजार 874 रूपये कर्ज असे एकूण थकबाकी 4 लाख 22 हजार 104 रुपये असून तुमच्यावर देय आणि देय कर्जाची रक्कम भरण्याची मागणी अनेक वेळा केली. पण तुम्ही कर्जाची रक्कम फेडण्यास टाळाटाळ करत आहात. त्यामुळे तुम्हाला या नोटीसद्वारे सूचित करण्यात येत आहे की, ही नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत 4 लाख 22 हजार 104 रुपये इतकी कर्जाची रक्कम भरावी. अयशस्वी झाल्यास कायद्याच्या कोर्टात तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडेल. अन् अशा परिस्थितीत तुम्ही खटल्यातील खर्च आणि परिणामांसाठी पूर्णपणे जबाबदार असाल. अशाप्रकारे बँकेकडून नोटीस प्राप्त झाली होती.