Ajit Pawar in Pune: केबिनच्या बंद दाराआड अजित पवार अन् जयंत पाटलांसोबत नेमकी काय चर्चा झाली? दादांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले...
Ajit Pawar on Jayant Patil Meeting Pune: आज सकाळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार 8 च्या सुमारास आले. तिथे त्यांनी उपस्थितांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर त्यांनी जयंत पाटलांशी चर्चा केली.

पुणे: पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीच्या बैठकीसाठी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बैठक पार पडली. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड सकाळी चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, यावर माध्यमांशी बोलताना आता खुद्द अजित पवारांनीच या भेटीवरती भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भेटीमध्ये कशावरती चर्चा झाली याबाबत देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. अर्थसंकल्पात कृषी उत्पादन वाढीसाठी केलेल्या तरतुदीसंदर्भात त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर माध्यमांनी काय बातम्या लावाव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती पाहुन बातम्या द्या. आमची व्हीएसआयची बैठक होती. त्यासाठी आम्ही मी आणि जयंत पाटील एकत्र आलो होतो, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
आजच्या व्हीएसआयच्या बैठकीत एआयचा महत्वाचा विषय होता. एआयचा फायदा होतो आहे. एआयचा वापर करणे काळाची गरज आहे. एआयचा वापर करुन ऊसाचे उत्पादन वाढले आहे. आम्ही त्याचा वापर फळबागा आणि इतर पिकांसाठी देखाल करणार आहोत.आजची नेहमीप्रमाणे आमची बैठक होती. या नियामक मंडळात जयंत पाटलांसह अनेक जण आहेत. त्यांनी काही मिटिंग घेतल्या होत्या. एआयचा वापर करून कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासंदर्भात मी अर्थसंकल्पात सांगितलं होतं. त्याकरता 500 कोटींची तरतूद केल्याचंही जाहीर केलं होतं. यावर जयंत पाटलांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. दोन बैठकांमध्ये थोडावेळ होता, म्हणून ती बैठक घेतली. आम्ही नेहमीप्रमाणे जनरल बॉडीला, नियामक मंडळाला येत असतो, काही कमिटीला येत असतो. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून कृषी उत्पादन कसं वाढेल, यासंदर्भातच आज चर्चा झाली. यातून टनेज कसं वाढेल यावर चर्चा झाली. प्रायोगिक तत्वावर केलेल्या कामामुळे टनेज वाढल्याचं लक्षात आलंय. त्यामुळे हे सर्वदूर करायचं आहे. सोयाबीन, कापूससारख्या पिकांसाठी एआयचा वापर करणं काळाची गरज आहे, या बाबी कृषी खात्याने आणि सरकारने मनावर घेतलं आहे, अशी माहिती देखील अजित पवारांनी यावेळी दिली आहे.
जयंत पाटील अन् अजित पवारांची बंद दाराआड चर्चा
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीकरता अजित पवार आज 8 वाजण्याच्या सुमारास आले. तिथे त्यांनी उपस्थितांची निवेदने स्वीकारली. भेटीसाठी आलेल्यांशी चर्चा केली. त्यानंतर तिथे जयंत पाटील देखील दाखल झाले. त्यानंतर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.
शरद पवारांचा कटाक्ष, अजितदादांनी हाताचा केला इशारा
शरद पवार, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील सर्वजण बैठकीसाठी आले होते. हर्षवर्धन पाटील आणि इतर नेते पुढे चालत आले, त्यांच्यामागे दिलीप वळसे पाटील होते, त्यांनी अजित पवारांच्या केबिनचा दरवाजा उघडला. तितक्यात त्यांच्यामागे असलेले शरद पवार चालत पुढे आले, शरद पवार यांनी अजित पवार बसलेल्या केबिनकडे कटाक्ष टाकला. काही सेकंद ते स्थिरावले, मात्र आत न जाता पुढे निघाले. याच वेळी अजित पवारांनी हाताने केबिनच्या दिशेने जाण्यास सांगितले. दिलीप वळसे पाटील यांनी दरवाजा उघडताच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक नजरानजर झाली. मात्र, त्यानंतर पवारांनी पुढे गेल्याचं दिसून आले.
अजितदादा-जयंत पाटील भेटीवर राऊतांचा टोला
वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केलाय. संजय राऊत म्हणाले की, त्यांचे उत्तम चाललेले असते. शिवसेनेतून आमचे जे काही लोक सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नाही तर आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही त्यांच्या आसपासही जाणार नाही. पण यांचे बरे असते, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट असते, एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, त्यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असे काहीही नाही. त्यामुळे आमच्या काही भेटीगाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी देखील आम्ही टाळतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

