Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Nashik Guardian Minister : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
Nashik Guardian Minister : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला असतानाच नाशिकमध्ये पुन्हा एकदा भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे पालकमंत्रिपदी निवड झाल्याबाबत अभिनंदनाचे बॅनर्स झळकायला सुरुवात झाली आहे. यामुळे महायुतीतील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारकडून मागील आठवड्यात शनिवारी (दि. 18) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Minister List) जाहीर करण्यात आली होती. या यादीत नाशिकमधून भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा होताच नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्ह्यात मोठी बॅनर्सबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) आणि रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला.
महाजनांचे बॅनर्स झळकल्याने महायुतीत वादाची ठिणगी?
महायुतीत अद्याप नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद कायम असतानाचा शहरात गिरीश महाजन यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स पुन्हा एकदा झळकायला सुरुवात झाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या माध्यमातून मायको सर्कल परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत नाशिकमधून कोण पालकमंत्री होणार? याबाबत अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. त्यातच आता गिरीश महाजन यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स नाशिकमध्ये झळकल्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार?
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा केलाय. तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटानेही नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा केलाय. त्यामुळे महायुती वाद सुरु असतानाच भाजप माजी नगरसेवकाने गिरीश महाजन यांचे बॅनर्स लावल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नाशिकचे पालकमंत्रिपद महायुतीत नेमकं कोणाला मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या