सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेला आरोपी सचिन माने हा चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याने गुजरात कर्नाटकसह महाराष्ट्र राज्यात ठिकाणी घरफोडी केली आहेत.
पुणे : शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांपुढे आव्हान बनत असून गंभीर गुन्ह्यांसह चोरी, दरोडे, खंडणीच्या गुन्ह्यामुळेही सर्वसामान्य नागरिकांना, उद्योगजकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांकडूनही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात असून पुणे (Pune) पोलिसांची कुमूक वाढविण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती दिली होती. त्यातच, काही दिवसांपूर्वी भोरमध्ये घरफोडी करुन घरातील सोनं-चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यशं आलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Police) अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून मोठी रक्कम आणि ऐवज जप्त करण्यात आला आहे. वेगवेगळ्या राज्यात घरफोडी करणाऱ्या ह्या आरोपीचं नाव लखन अशोक कुलकर्णी उर्फ सचिन राजू माने असून तो मूळचा सोलापूर येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेला आरोपी सचिन माने हा चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याने गुजरात कर्नाटकसह महाराष्ट्र राज्यात ठिकाणी घरफोडी केली आहेत. आरोपीने भोर शहरात घरफोडी केली होती, तेथून मोठ्या प्रमाणात रोकड व दागिने घेऊन त्याने धूम ठोकली होती. मात्र, अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीवर जवळपास 50 पेक्षा अधिक घरफोडीसह इतर गुन्हे दाखल आहेत. या अगोदर आरोपीने कर्नाटक राज्यात चोरी केल्यानंतर 7 वर्षाची शिक्षा भोगून बाहेर पडला आहे. त्यानंतर काही महिन्यापूर्वी तो सातारा पोलीस स्टेशनमध्ये देखील एका गुन्ह्यात अटक होता. मात्र, येथील गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर आरोपीने ही भोर शहरात घरफोडी केली होती.
भोरमध्ये मोठी घरफोडी
पुणे ग्रामीण पोलिसांनी साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 2 किलोग्रॅम वजनाचे चांदीचे भांडे, रोख रक्कम, कार असा 16 लाख 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हा सराईत घरफोडी करणारा असून घराची कुलूप कडी उचकटून घरफोडी करत होता. भोरमध्ये एका घरातून सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा 26 लाख 874 रुपयांचा मुद्देमाल त्याने लंपास केला होता. याप्रकरणी, पीडित कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
आरोपी एकटाच चोऱ्या करून आलिशान गाडीमधून फिरत होता, वेगवेगळ्या ठिकाणी फिरुन घरफोडीचे प्लॅन आखत होता. या आरोपीने अशाप्रकारे अजून कुठे घरफोड्या किंवा इतर चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास ग्रामीण पोलीस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
हेही वाचा
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली