Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Crime : ऑनलाईन जंगली रमीच्या नादात एका तरुणानं चोरीचा मार्ग निवडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या तरुणाला रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली आहे.
Kalyan Crime News : ऑनलाईन जंगली रमीच्या नादात एका तरुणानं चोरीचा (Crime) मार्ग निवडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या चोरट्या तरुणाला रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे जिल्ह्यातील चाकण मधून अटक केली आहे. योगेश निवास चव्हाण असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून रेल्वे पोलीस पथकानं त्याच्याकडून 7 लाख 7 हजाराचे दागिने हस्तगस्त करून जप्त केलंय. अशी माहिती कल्याण (Kalyan Crime News) रेल्वे गुन्हे शाखाचे वरिष्ठ पो. निरीक्षक विजय खेडकर यांनी दिली आहे.
जंगली रम्मीचा नादात 'तो' बनला अट्टल गुन्हेगार
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरमध्ये राहणारे तक्रारदार राहुल सुहास सोनी, (वय 33) हे 6 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्टेशनयेथुन सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन असा कुटूंबासह प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या आईची शोल्डरपर्स दोन्ही बर्थच्या मध्ये असलेल्या ट्रेवर ठेऊन झोपी गेल्या. अशातच माढा ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान गाडी आली असतांना ट्रे वरील पर्स आतील सोन्याच्या दागीन्यासह कोणीतरी अज्ञात चोरट्याने झोपेचा फायदा घेऊन लंपास केली. त्यानंतर या घटनेची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सोनी यांनी दिली आणि अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अटक
दरम्यान, दाखल गुन्ह्याच्या आधारे कल्याण रेल्वे पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकानं समांतर तपास सुरू केला असता, माढा रेल्वेस्थानक ते कल्याण स्थानक दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा योगेश हा संशयित रित्या हालचाली करत असल्याचा दिसून आला. त्या आधारावर त्याची ओळख पटवून त्याचा ठावठिकाणा पोलिसांना शोधून काढला. त्यानंतर लोहमार्ग गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहीत सावंतसह, मंगेश खाडे (सायबर सेल) यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखा, कल्याण युनिटचे उपनिरीक्षक, तसेच पुणे येथील रेल्वे पोलीस अधिकरी दादासाहेब लाड, विशाल मोरे, यांच्या पथकानं तांत्रीक तपासाचे आधारे आरोपी योगेश निवास चव्हाण याला सापळा रचून पुणे जिल्ह्यातील चाकण मधून अटक केली.
दरम्यान आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडे रेल्वे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बॅग आणि पर्स लंपास केल्याचे समोर आले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 7 हजाराचे दागिने जप्त केले आहे. तसेच अधिक तपासात आरोपी योगेश चव्हाण याला ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा नाद आहे. तो चोरीचे दागिने विकून मिळालेले सर्व पैसे तो जंगली रमीमध्ये हरला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा रविंद्र ठाकुर करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा