डमी विद्यार्थी ऐकलं होतं आता झेडपी शाळेत चक्क डमी गुरुजी! ग्रामस्थ आक्रमक; पारनेरमधील धक्कादायक प्रकार समोर
Parner Ahmednagar News Dummy teacher in ZP school: मांजरधाव प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने स्वतःच्या जागेवर डमी शिक्षकाची नेमणूक केल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
Parner Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) पारनेरच्या हिवरे कोरडा येथील मांजरधाव प्राथमिक शाळेतील (ZP School) एका शिक्षकाने स्वतःच्या जागेवर डमी शिक्षकाची नेमणूक केल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे दोन वर्ष हा प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करून देखील कारवाई झाली नव्हती मात्र आता ग्रामस्थांच्या रेट्यापुढे शिक्षण विभागाला झुकावं लागलं आणि त्यांनी अखेर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
हा प्रकार दोन वर्षांपासून सुरू
मांजरधाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बाजीराव पानमंद यांनी आपल्या जागी एका खासगी बेरोजगार डीएड धारक युवक कुलदीप जाधव याला शाळेत पाठवून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नेमणूक केली होती, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. विशेष म्हणजे हा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली होती मात्र तरी देखील यावर कारवाई झाली नव्हती.
शिक्षक 5 जानेवारीपासून रजेवर
ग्रामस्थांच्या रेट्यानंतर अखेर गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब घुगे यांनी शाळेला भेट दिली आणि त्या ठिकाणी संबंधित खासगी शिक्षक जाधव हे आढळून आले. दरम्यान बाजीराव पानमंद हे शिक्षक 5 जानेवारीपासून रजेवर होते. मात्र त्यांनी बेकायदा स्वतःच्या जागेवर दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक केली, याबाबत चौकशी करण्यात येऊन वरिष्ठांना अहवाल सादर केला जाईल असं बुगे यांनी सांगितलंय.
'राजकीय द्वेषातून माझी बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न'
शिक्षक बाजीराव पानमंद यांचीही प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली, नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय द्वेषातून माझी बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न असावा असं त्यांनी म्हटलंय. सोबतच मी रीतसर रजेवर आहे आणि येऊ घातलेल्या 26 जानेवारी रोजी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याने कुलदीप जाधव यांना आपण सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी शाळेत बोलावले होते असं त्यांचं म्हणणं आहे.
मात्र ग्रामस्थांनी संबंधित शिक्षक कुलदीप जाधव हे दोन वर्षांपासून शाळेत पानमंद यांच्या जागी शिकवत असल्याचं सांगितलं आहे, तसे व्हिडिओ देखील त्यांनी बनवले आहेत. विशेष म्हणजे कुलदीप जाधव हा बाजीराव पानमंद यांच्या पतसंस्थेमधील कर्मचारी असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना देखील विचारले असता त्यांनी आमचे शिक्षक हे कुलदीप जाधव हेच आहेत असे म्हटले आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढावी यासाठी शासन - प्रशासन प्रयत्न करत असताना अशा पद्धतीने शाळेतील शिक्षक हे आपल्या जागी डमी शिक्षक शाळेत पाठवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने चर्चेला उधाण आलंय.