Beed Crime: बेदम मारुन लेकाला संपवलं, नंतर विकासच्या आई-वडिलांना फोन लावून क्षीरसागर म्हणाला, 'अर्जंट माझ्या घरी या'
Beed crime Vikas Bansode death: मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन विकास बनसोडे याला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्या शरीरावर काळे-निळे वळ दिसत होते.

बीड: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणासारखाच आणखी एक प्रकार बीड जिल्ह्यातील कड येथे घडला होता. याठिकाणी विकास बनसोडे (वय 23) या तरुणाची बेदमपणे मारहाण करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. संपूर्ण अंगावर काळेनिळे वळ उठेपर्यंत विकासला (Vikas Bansode) मारहाण करण्यात आली. यामध्ये विकासचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर टाकून आरोपींनी पळ काढला होता.
आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याच्या मालकीच्या ट्रकवर विकास बनसोडे हा चालक म्हणून काम करत होता. मात्र, दरम्यानच्या काळात भाऊसाहेब क्षीरसागर यांची मुलगी आणि विकास यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यामुळे भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासला कामावरुन काढून टाकले होते. गेल्या आठवड्यात विकास आणि क्षीरसागर यांची मुलगी शेतात आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आले होते. त्यामुळे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या संतापाचा पारा चढला. त्यांनी आपल्या काही नातेवाईकांसह विकास बनसोडे याला एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले. याठिकाणी विकासला दोरी आणि वायरच्या साहाय्याने प्रचंड मारहाण करण्यात आली. या अमानुष मारहाणीत विकासचा मृ्त्यू झाला. त्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासच्या फोनवरुनच त्याच्या आई-वडिलांना फोन लावला होता. या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये भाऊसाहेब क्षीरसागर विकासच्या आई-वडिलांना दमदाटी करताना दिसत आहे.
भाऊसाहेब क्षीरसागर विकासच्या पालकांना म्हणाला की, तुम्ही नवरा-बायको लवकरात लवकर माझ्या घरी या. तुमचं जे कोणी असेल त्याला घेऊन इकडे या. इकडे आल्यावर तुम्हाला पराक्रम सांगतो. तुमचा लेक माझ्याकडे आहे. जास्त टाईमपास करु नका. तुम्ही लवकर आमच्या घरी या, असे भाऊसाहेब क्षीरसागर याने म्हटले.
विकासच्या आई-वडिलांची विनवणी
भाऊसाहेब क्षीरसागर याने घरी येण्याचा हुकूम दिल्यानंतर विकास बनसोडेची आई म्हणाली की, आता आम्हाला एवढं अर्जंट वाहन कसं मिळणार, आम्ही कसं येणार? त्यावर भाऊसाहेब क्षीरसागर म्हणाला की, तुम्ही संध्याकाळपर्यंत इथे आले पाहिजे. तुम्हाला नसेल जमत तर मला सांगा. तुम्ही आता लगेच गाडीत बसा, असे क्षीरसागर म्हणाला. त्यावर विकासच्या आईने आपल्या मुलाला आणखी न मारण्याची विनंती केली. तुम्ही आतापर्यंत त्याला जी काही मारहाण केली असेल, पण आता त्याला मारु नका. आम्ही येतो पण त्याला हात लावू नका, असे विकासच्या आईने म्हटले. मात्र, तोपर्यंत दोन दिवसांच्या बेदम मारहाणीने विकास बनसोडे याचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

