Gayatri Shingne: काकाविरुद्ध पुतणी इरेला पेटली, राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात येताच पुतणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत!
Vidhan Sabha Nivadnuk 2024 : आमदार राजेंद्र शिंगणे यांनी घड्याळाची साथ सोडताच, गायत्री शिंगणे यांचा तुतारीची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
Gayatri Shingne , Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच, निवडणुकीच्या रिंगणात उतरायला इच्छुक असणाऱ्यांनी त्या-त्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता एका माजी मंत्र्यांच्या पुतणीनं स्वतःच्या काकांविरोधात दंड थोपडले आहेत. माजी मंत्री आणि बुलढाण्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत शरद पवारांची (Sharad Pawar) तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. पण, आता राजेंद्र शिंगणे आल्यामुळे त्यांचीच पुतणी नाराज झाली असून अजित पवारांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आमदार राजेंद्र शिंगणे यांनी घड्याळाची साथ सोडताच, गायत्री शिंगणे (Gayatri Shingne) यांचा तुतारीची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. रांजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. तसेच, गायत्री शिंगणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या आखाड्यात बुलढाण्यातील सिंदखेडराजा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी असा जंगी सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
गायत्री शिंदेंनी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाला दिलेला इशारा...
बुलढाण्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकताच अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तसेच, सिंदखेडराजामधून राजेंद्र शिंगणे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच काकांच्या येण्यानं आधीपासूनच शरद पवारांसोबत असलेल्या गायत्री शिंगणे मात्र नाराज झाल्याच्या चर्चा आहे. कारण, गायत्री शिंगणे यांनी सिंदखेडराजा मतदारसंघासाठी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली आहे. काका राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षप्रवेशानंतर गायत्री यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष लढणार असा इशाराही शरद पवार गटाला दिला होता.