Holi 2025 : होळीत नारळ का अर्पण करतात? काय आहे यामागचं मोठ्ठं कारण? जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार...
Holi 2025 : होळीचा सण साजरा करताना अनेक प्रथा, परंपरा महाराष्ट्रातील विविध भागांत पाळल्या जातात. यापैकीच एक म्हणजे होळीत नारळ टाकण्याची प्रथा.

Holi 2025 : होळीचा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी (Holi 2025) हा सण भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करतात. या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येतात. होळीच्या दिवशी होलिका दहन केलं जातं तर दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाला रंगांची उधळण करुन होळी खेळली जाते.
त्याचप्रमाणे, होळीचा सण साजरा करताना अनेक प्रथा, परंपरा महाराष्ट्रातील विविध भागांत पाळल्या जातात. यापैकीच एक म्हणजे होळीत नारळ टाकण्याची प्रथा. खरंतर आपल्यापैकी अनेकांना या संदर्भात माहिती नाही. हीच माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊयात.
होळीत नारळ का अर्पण करतात?
होळीत नारळ टाकण्याची परंपरा आहे. पण, होळीत नारळ का आणि कशासाठी टाकला जातो हे अनेकांना माहीतच नसते. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
- नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. नारळाला कामधेनु तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते अशी मान्यता आहे.
- तसेच, घरातील व्यक्तींवर असलेला कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होते. त्याचबरोबर अशी देखील समजूत आहे की, नारळाला होळीच्या अग्नीत समर्पित केल्यास व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात.
- तसेच, होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते अशी सुद्धा मान्यता आहे.
होळी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त
यावर्षी पंचांगानुसार, 13 मार्च 2025 ला रात्री 11.26 वाजल्यापासून ते रात्री 12.30 वाजेपर्यंत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी घरातून एक नारळ हातात धरुन शेंडीबाहेर असेल असाच हातात धरावा. तसेच, तो नारळ संपूर्ण घरात फिरवून होळीच्या दहनाच्या मुहूर्तावर अग्नीत अर्पण करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















