सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ; हमीभावापेक्षा कमी मिळतोय बाजारभाव
Agriculture News : गेल्या काही दिवसांनपासून विदर्भातील बहुतांश बाजार समित्यात सोयाबीनच्या दरात घट होत असल्याचे चित्र आहे. या दरात अचानक घसरण झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वाशिम : राज्यात अवकाळी पावासचा (Unseasonal Rain) आणि आता ढगाळ वातावरणाचा फटका इतर पिकांना बसण्याची चिंता शेतकाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने रब्बीचा पेरा वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळं धास्तावलेले शेतकरी पीक वाचवण्यासाठी औषधांची फवारणी करत आहेत. अशातच मोठ्या कष्टाने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात अनियमित पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले असले, तरी बाजारात सोयाबीनच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनला 5 हजार 200 रुपयांपर्यंत दर मिळाला, त्यात आता पुन्हा घट झाली असून सध्या चार हजार ते साडे चार हजार इतका दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे.
सोयाबीनच्या दरात अचानक घसरण
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि अचानक ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक फटका शेतमालाला बसतो आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम निसर्गासह बाजार व्यवस्थेवरही बसतांना दिसतो आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनमधून शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही आले नही. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. उत्पादनात घट झाल्याने मागणीत वाढ होऊन दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या काही दिवसांनपासून विदर्भातील बहुतांश बाजार समित्यात सोयाबीनच्या दरात घट होत असल्याचे चित्र आहे. मधल्या काळात सोयाबीनला प्रतिक्विंटल 5 हजार ते 5 हजार 200 रुपये दर मिळाला होता. त्यानंतर या भावात आणखी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना होती. पण गेल्या काही दिवसांत सोयाबीनचे दर स्थिरावले आणि आता या दरात अचानक घसरण झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
‘यलो मोझॅक’रोगाचे आक्रमण
अस्मानी संकटासह बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात देखील सापडला आहे. आजघडीला शेतकऱ्यांच्या हाती एकरी तीन ते चार तर काहींना दोन ते तीन क्विंटल सोयाबीन आले. त्यामुळे नफा तर दूर मात्र उत्पादन खर्च निघेल एवढाही दर मिळेनासा झाला आहे. तसेच अनेक भागांत अचानक हवामान बदल आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर ‘यलो मोझॅक’ चे आक्रमण झाले. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.
असा आहे बाजारभाव
कारंजा बाजार समिती मध्ये 7 डिसेंबर रोजी 3500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर 4 हजार 820 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वाशिम बाजार समिती मध्ये 3500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर 4 हजार 750 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, मंगरुपिळ बाजार समिती मध्ये 1200 क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर 5035 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, मनोरा बाजार समिती मध्ये 170 क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर 4 हजार 850 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजारात हमीभावापेक्षा दर कमी झाल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानभवनात गदारोळ
सध्या सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशानात देखील शेतकरी प्रश्नावरून विरोधकांनी सभात्याग करून कापूस सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी जोरदार मागणी केली. मात्र सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा न घेतल्यानं विरोधक अधिक आक्रमक झाले, परिणामी विधान भवनाच्या बाहेर येऊन पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी करत मागणी लावून धरली. यावेळी विरोधकांचा आवाज दाबत असल्याचाही आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला.