Santosh Deshmukh Murder Case : रात्री झोप येत नाही, आईकडे, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एसआयटी आणि सीआयडीच्या तपासानंतर बीडच्या न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Santosh Deshmukh Murder Case : गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून दिलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एसआयटी आणि सीआयडीच्या तपासानंतर बीडच्या न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रमुख सूत्रधार वाल्मीक कराड असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, खंडणी, ॲट्रॉसिटी, अपहरण आणि हत्या या सर्वच गुन्ह्यांमध्ये वाल्मीक कराडची टोळी कार्यरत असल्याचे सुद्धा सिद्ध झालं आहे.
हे कोणाच्या जीवावर गुन्हे करत होते?
दरम्यान, 80 दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख यांनी ही संघटित गुन्हेगारी असल्याचे म्हटलं आहे. तुम्ही गुन्हे करा, मी तुमच्या पाठीशी आहे असाच वरदहस्त त्यांच्या पाठीशी होता आणि त्यामुळे ही घटना झाल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितले. अत्यंत क्रूर पद्धतीने माझ्या भावाला का संपवण्यात आलं. हे कोणाच्या जीवावर गुन्हे करत होते अशी विचारणा सुद्धा धनंजय देशमुख यांनी केली. 22 गुन्हे नोंद असणाऱ्यांसोबत पोलीस चर्चा करत असतील, हॉटेलमध्ये जात असतील, तर ही हत्या कोणी केली असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरोपींना सर्रास वावरू दिल्याचे ते म्हणाले. घटना घडल्यानंतर आमच्याकडे अनेक लोक आले होते. अनेकांनी व्यथा व्यक्त केल्या होत्या. मात्र, समोर येण्यास कोणी धजावत नव्हते. संघटित गुन्हेगारीतून केलेलं हे कृत्य असून आणि यांना यंत्रणांचं अभय होतं असा आरोप सुद्धा त्यांनी केला.
दरम्यान, खंडणी, अॅट्रॉसिटी, हत्या तिनही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. २९ नोव्हेंबर रोजी सुदर्शन घुले याच्या फोनवरुन वाल्मीक कराड याने खंडणी मागितली होती. सहा तारखेला देशमुख यांचा आरोपी घुले याच्यासह वाद झाला होता, असं या आरोप पत्रात म्हटले आहे. वाल्मीक कराड याच्या विरोधातील सर्व पुरावे पोलिसांनी गोळा केले आहेत. तसेच पाच गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिला आहे. सुदर्शन घुलेनं वाल्मीक कराडला फोन केला होता. यावेळी कराडने सुदर्शन घुलेला म्हणाला की, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण कुणालाही सोडणार नाही. सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराड या दोघांमधील हा संवाद आहे. यानंतर घुलेनं अवादा कंपनीत जाऊन खंडणी मागितली होती.
इतर महत्वाच्या बातम्या

























