गौणखनिजाचे गौडबंगाल, बनावट रॉयल्टी पुस्तके छापून डंबर लॉबीकडून सरकारला कोट्यवधींचा चुना, प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष
पनवेल आणि उरण परिसरात जवळपास शंभरच्यावर क्रशर ( क्वॅारी ) चे प्लांट आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भागात मोठ्या संख्येने या प्लांटची उभारणी करण्यात आली आहे.
नवी मुंबई: गौणखनिजांवरील (Minor Mineral) रॅायल्टी भरण्याचे बनावट पावती बुक छापून महसूल विभागाला करोडोंचा चुना लावण्याचे काम डंपर लॅाबीकडून सुरू आहे. दिवसाला दीड ते दोन हजार डंपर बनावट रॅायल्टी पावत्यांचा वापर करून मुंबईत (Navi Mumbai News) प्रवेश करत आहेत. सदरचा प्रकार समोर येताच पनवेल शहर पोलीस ठाण्यात (Panvel Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल आणि उरण परिसरात जवळपास शंभरच्यावर क्रशर ( क्वॅारी ) चे प्लांट आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भागात मोठ्या संख्येने या प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या क्रशर प्लांटमधून दिवसाला अडीच ते तीन हजार डंपर रेती, खडी, दगड हे मुंबई , उपनगर , नवी मुंबई , ठाणे भागात पाठवले जातात. बांधकाम प्रकल्प, रस्ते काँक्रेटीकरण, आरऐमसी प्लांट आदींसाठी याचा वापर होतो. सरकारचा महसूल विभाग या गौणखनिजांवर रॅायल्टी आकारात असते. मात्र रॅायल्टी भरण्यापोटी बनावट पावती पुस्तके छापून सरकारी यंत्रणेच्या डोळ्यात धुळफेक करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
असोसिएशनकडून महसूल आणि मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार
नकली रॅायल्टी पावतीवरील असलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यावर कोणताही ओटीपी येत नाही. मात्र खऱ्या रॅायल्टी पावतीवरील स्कॅन केल्यावर ओटीपी नंबर जनरेट होतो. हा प्रकार लक्षात येताच दगडखाण क्रशर असोसिएशनकडून महसूल आणि मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान पनवेल तहसील कार्यालय, महसूल विभाग, आरटीओ , पोलीस यांचा आशिर्वाद मिळत असल्यानेच हा प्रकार चालू असल्याचा आरोप दगडखाण असोसिएशनने केला आहे.
हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार
बनावट रॅायल्टी पुस्तके तयार करून महसूल विभागाचे महिन्याला 22 कोटी असे वर्षाला जवळपास 250 ते 300 कोटींचे नुकसान या डंपर लॅाबीकडून करण्यात येत आहे. असाच प्रकार ठाणे, भिवंडी , पालघर भागात सुरू असण्याची शक्यता असल्याने हजारो करोडोंचा महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौणखनिज प्रकरणी सरकारची करोडो रूपयांची फसवणूक होत असल्याने या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे भाजपा आमदार महेश बालदी यांनी स्पष्ट केले आहे.
पनवेल तहसील कार्यालया अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भाग येतो. याच ठिकाणावरून मोठ्या संख्येने रेती , खडी, दगडाचे उत्खनन करून ते मुंबई बरोबर इतर भागात पाठवले जाते. यासाठी अडीच ते तीन हजार डंप्पर अहोरात्र कार्यरत आहेत. यातील जवळपास ५० ते ६० टक्के डंप्पर गौणखनिज ची रॅायल्टी बुडवुन, बनावट पावतीवर माल घेवून जात असल्याने करोडो रूपयांचा महसूल बुडत आहे. मात्र यावर विशेष लक्ष न देता तोंडदेखली कारवाई करण्याचे नाटक पनवेल तहसील कार्यालय करीत आहे. डंप्पर माफीयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश रायगड जिल्हाधिकारी विभागाने देवूनही , गुन्हा दाखल करण्यास पनवेल तहसीलदारांनी विलंब लावण्यात आल्याचा आरोप श्रीकानिबा दगडखाण क्रशर चालक मालक संघटनेने केला आहे.
हे ही वाचा :
Pune Crime News : ऑनलाईन भेटली म्हणून प्रत्यक्ष भेटण्यासाठी पैसे पाठवत राहिला, अन् पुणेरी तरुणाला लाखाचा बांबू लागला!