महाराष्ट्रात पान मसालाला नो एन्ट्रीच, बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार, रजनीगंधाला दिलासा नाहीच
High Court on Pan Masala : उत्तर प्रदेश सरकारला नसेल पण महाराष्ट्र सरकारला इथल्या नागरिकांच्या आरोग्याची चिंता आहे. त्यामुळे आम्ही पान मसालावरील बंदी उठवू शकत नाही

High Court on Pan Masala : उत्तर प्रदेश सरकारला नसेल पण महाराष्ट्र सरकारला इथल्या नागरिकांच्या आरोग्याची चिंता आहे. त्यामुळे आम्ही पान मसालावरील बंदी उठवू शकत नाही,अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने पान मसाला विक्री करणा-या कंपनीला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. पान मसाला विक्री करणाऱ्या एका कंपनीच्या वतीने करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने 'रजनीगंधा' या पान मसाल्यावरील राज्यातील बंदी उठवण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
याचिकाकर्त्यांची कंपनी ही उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये असून तिथं पान मसालावर कोणतीही बंदी नसल्याचा दावा करून ही बंदी उठवावी, अशी मागणी हायकोर्टाकडे करण्यात आली होती. मात्र, तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणा-या कॅन्सरवर उपचारांसाठी युपीतील नागरिकही मुंबईतील टाटा रुग्णलायात येतात. त्यामुळे पान मासालावरील बंदी योग्यच असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला होता.
याचिकेत काय म्हटलं होतं?
अन्न व औषध प्रशासनाने 18 जुलै 2023 मध्ये परिपत्रक जारी करत राज्यभरात गुटखा, सुगंधी पान मसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदी वर्षभरासाठी कायम ठेवली होती. या आदेशानुसार वर्षभराच्या कालावधीसाठी उत्पादकांना तंबाखू आणि सुपारीची साठवणूक, वितरण, वाहतूक तसेच विक्री करण्यास प्रतिबंधित करते. या निर्णयाविरोधीत रजनीगंधा पान मसाला कंपनीच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आमचा तंबाखूजन्य पदार्थांशी संबंध नसल्यानं आपण पान मसाला आणि सुगंधी सुपारी विक्रीवरील बंदीला आव्हान दिल्याचं त्यांनी या याचिकेतून म्हटलं होतं. अन्न आणि सुरक्षितता विभागाच्या आयुक्तालयाकडून याचिकाकर्त्यांना पान मसाल्याची विक्री तथा उत्पादन करण्याचा परवाना मिळाला होता. परंतु, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं तो रद्द केला. मुळात परवाना रद्द करण्याचा प्राधिकरणाला अधिकारच नाही, त्यांनी घातलेली बंदी ही कायदा आणि नियमांच्या तरतुदींचं उल्लंघन करणारी आहे,असा दावा करण्यात आला होता.
गुटखा बंदी करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य होतं
मात्र, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं मात्र प्रतिज्ञापत्राद्वारे या याचिकेतील सर्व आरोपांचे खंडन केलं. साल 2012 मध्ये राज्य सरकारनं लावलेली पान मसाला आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदी अद्यापही कायम आहे. राज्य सरकारनं शास्त्रोक्त अभ्यास करूनच बंदीचा हा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. याचिकाकर्त्यांना बंदी आदेशांच्या 12 वर्षांनंतर त्याला आव्हान दिलंय. तसेच रजनीगंधा आरोग्यास हानीकारक नाही, असा कोणताही अहवाल कोर्टात सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांची मागणी फेटाळून लावावी, अशी मागणीही केली गेली. गुटखा बंदी करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य होतं. अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत राज्य सरकारनं सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी तंबाखूजन्य पदार्थ गुटखा किंवा पान मसाला, विक्रीसाठी किंवा साठवण्यास किंवा वितरणासाठी उत्पादन करण्यासही बंदी घातली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar on Supriya Sule : फक्त मोदी-शाहांवर टीका करुन चालत नाही, निधीही आणावा लागतो, अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
