12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
विक्रम काळे यांनी 12 वी परीक्षा केंद्रावर पाहणी करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

धाराशिव : राज्यात आजपासून 10 वी (SSC) बोर्डाची परीक्षा सुरु झाली असून गेल्या काही दिवसांपासून 12 वीची परीक्षा सुरू आहे. राज्य सरकारने दोन्ही परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान राबवलं असून परीक्षा केंद्रावर विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पोलीस, अधिकारी, केद्र प्रमुख यांच्या जोडीला काही केंद्रावर ड्रोनचीही मदत होत आहे. मात्र, तरीही कॉपी केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. तर, भरारी पथके व शिक्षणमंत्री परीक्षा केंद्रावर भेटी देताना दिसून आले. आता, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिक्षक आमदार (MLA) विक्रम काळे यांनी चार जिल्ह्यात जाऊन परीक्षा केंद्रावर फोटोसेशन केल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाल्याची चर्चा परीक्षा केंद्रांवर सुरू आहे. आ. विक्रम काळे यांच्याकडून 12 वी परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर फोटोसेशन करण्यात आल. पेपर चालू असताना भेट देत फोटो काढल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होत नसेल का? असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.
विक्रम काळे यांनी 12 वी परीक्षा केंद्रावर पाहणी करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राज्य सरकार कॉपीमुक्त अभियान राबविण्यात व्यस्त असताना सत्ताधारी आमदारांनी फोटो सेशन केल्याने याला काय म्हणावं, अशी चर्चा राजकीय व शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे. कॉपीमुक्त अभियान परीक्षा केंद्रावर मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक गॅजेटला बंदी असताना आमदार विक्रम काळे यांना हे नियम लागू नाहीत का? असा देखील प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जात आहे. आमदार काळे यांनी धाराशिवमधील येडशी, सोलापूरमधील बार्शी, बीडमधील धारुर आणि परभणीतील पाथरी येथील बोर्ड परीक्षा केंद्रावर जाऊन पाहणी केली. यावेळी, वर्गात फोटो देखील काढले आहेत.
दरम्यान, शिक्षक आमदार विक्रम काळे हे परीक्षा बोर्डाचे सदस्य असल्याने ते विद्यार्थ्यांच्या वर्गावर जाऊन पाहणी करू शकतात, पण फोटो काढण्याबाबत माहीत नाही, असे परीक्षा महामंडळ अधिकारी यांनी या फोटोसेशन संदर्भातील प्रश्नावर बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.
धाराशिव– बीड– परभणी जिल्ह्यातील 12 वी बोर्ड परीक्षा केंद्रांना भेटी
1. काल येडशी, उकडगाव
2. ता.बार्शी जि. सोलापूर
3. धारूर जि. बीड
4. गंगामसला ता. माजलगाव .जि. बीड
5. पाथरी
6. देवनंद्रा ता. पाथरी.जि. परभणी
येथील इयत्ता बारावीच्या (HSC) बोर्ड परीक्षेच्या केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या भौतिक सुविधांची पाहणी केली व परीक्षा सुरळीतपणे व कॉपीमुक्त वातावरणात सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केले. विशेष करून सोलापूर जिल्ह्यात ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्राची पाहणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग मार्फत करण्यात येत आहे, प्रत्येक केंद्राची पाहणी केली जात असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले, अशी पोस्ट आमदार विक्रम काळे यांनी केली आहे.
कॉपीप्रकरणाची चौकशी करुन केद्र रद्द करू - भुसे
10 वीच्या पेपरला आज सुरुवात झाली अन् लगेचच जालना येथे कॉपी व पेपर फुटीचे प्रकरण समोर आले. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी परीक्षा केंद्र रद्द करून कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाने सर्व विभागाच्या बैठका घेतल्या आहेत. तसेच विद्यार्थी व सर्व विभागाला दबाव न घेता परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन देखील केले आहे. राज्यात काही ठिकाणी कॉपी झाली, कॉपी पुरविण्याचे प्रकार समोर आले आहेत, तशा चित्रफितही प्रसार माध्यमातून पुढे आल्या आहेत. याबाबत, निश्चितपणे गंभीर दखल शासन स्तरावर घेतली आहे, असे मंत्री दादा भुसे यांनी म्हटले. यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाले ते केंद्र रद्द करण्यात आले आहे, त्यात बदल करण्यात आला आहे. तसेच, यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली आहे, त्या केंद्रावरील प्रशासन देखील बदलण्यात आले आहे. यापुढेही कॉपीसंदर्भाने कठोर कारवाई केली जाईल, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

