Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात असल्याचे सरकारला माहित आहे, असा खळबळजनक दावाही मनोज जरांगेंनी केलाय.

Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तर या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय असल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मस्साजोग येथे भेट घेऊन सांत्वन केले. यानंतर त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, अशी मागणी देखील मनोज जरांगेंनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्य सरकार बदनामीच्या दिशेने चालले आहे. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली आहे. विनाकारण वेठीस धरले जात आहे. तपास यंत्रणा किती स्ट्रॉन्ग आहे ते यावरून कळत आहे. वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण गेला ती गाडी पोलिसांनी झाकून ठेवली. प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्याला सह आरोपी केले नाही, त्यांना सर्वात जास्त यातील माहिती आहे. यातील कोणत्याच आरोपींना सह आरोपी केले नाही. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना देखील सह आरोपी करा. त्यांनी आंदोलन दडपले होते. या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई होत नाही, असे त्यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा
चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे देखील यात आहे. टोळ्या सांभाळण्याचा त्यांना नाद आहे. यातील आरोपी त्यांचेच आहे त्यामुळे त्यांना सह आरोपी करा, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरणात सह आरोपी करा, अशी मागणी केली. तर सरकारला माहित आहे की यात धनंजय मुंडे यांचा हात आहे, असा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला.
...तर आम्ही मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटू
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, खंडणीतून हा खून झाला आहे. यातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे. यातील आरोपींना मदत करणारे सह आरोपी का नाहीत? माझे आरोप नाही तर हे सत्य आहे. सरकार यात बदनाम होत आहे. ही केस अंडरट्रायल चालली पाहिजे आणि फाशी झाली पाहिजे. आरोपींना अटक करतील अशी शक्यता नाही. मुख्यमंत्र्यांनी यात आदेश द्यावे. आम्ही सर्वजण त्यांची पाठ थोपटू, असे त्यांनी म्हटले.
न्याय मिळाला नाही तर मी शांत बसत नाही
कलेक्टर आणि तपास यंत्रणांना दोष देऊन फायदा नाही. सरकारने काम करू दिले तर राज्यातील गुंडगिरी बंद होईल. सरकारने मोकळा हात सोडला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं तर सर्व काही होऊ शकते. उपोषणाची वेळ गावकऱ्यांवर यावी, याचे मला वाईट वाटते. तुम्हाला नाही म्हणता येईना आणि हो ही म्हणता येईना. पोलीस अधिकारी प्रशांत महाजन सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार आहे. आरक्षणाच्या बाबत, संतोष भैय्याच्या बाबत किंवा सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबत न्याय मिळाला नाही तर मी शांत बसत नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
आणखी वाचा



















