Uddhav Thackeray Interview : 'मनसेसोबत सध्या कुठलीही चर्चा नाही', उद्धव ठाकरेंकडून 'त्या' चर्चांना पूर्णविराम
Uddhav Thackeray Interview : त्यामुळे आता यावर बोलण्याची आवश्यकता नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे.
Uddhav Thackeray Interview : 'चर्चेला आधार असता तर चर्चा थांबली नसती', असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसे (MNS) आणि शिवसेने (ठाकरे गट)च्या युतीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टमधील उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग हा गुरुवारी (27 जुलै) रोजी प्रदर्शित करण्यात आला. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील काका-पुतण्यांच्या नात्यांवरही भाष्य केलं आहे. तर यावर जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा विचार करु असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
'त्या' चर्चांना उद्धव ठाकरेंकडून पूर्णविराम
तर मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'त्या चर्चांना आधार नाही मिळाला म्हणून चर्चा थांबल्या. त्या चर्चांमध्ये काही तथ्य असतं तर चर्चा थांबल्या नसत्या.' मनसे युतीचा जर प्रस्ताव आला तर काय कराल यावर बोलतांना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'मी आलं तर गेलं तर याविषयी विचार नाही करत. जर प्रस्ताव आला तर त्यावेळेस परिस्थिती पाहून विचार करेन. त्यामुळे सध्या तरी अशा कोणत्याही चर्चा नाहीत. '
राज्यातील राजकारण हे मुलांच्या भोवती फिरताना दिसतं यावर बोलतांना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, "कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही." तर जे घराणेशाहीला विरोध करत आहेत तेच लोकं घराणी फोडत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राज्यात मनसे आणि शिवसेना युतीच्या चर्चा
अजित पवारांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. त्यातच मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चांनी राजकारणात चांगलाच जोर धरला. शिवसेना भवन, कल्याण - डोंबिवली यांसारख्या अनेक ठिकाणी ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनर झळकायला सुरुवात झाली. मनसैनिकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली होती. महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन या दोन्ही बंधूना करण्यात येत होतं. पण यावर दोन्ही पक्षांकडून कोणतीही पुष्टी करण्यात येत नव्हती.
दरम्यान अजित पवारांच्या बंडानंतर मनसे नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंना साथ देऊया असा सूर लावला. पण त्यावेळी राज ठाकरे यांनी कोणत्याही प्रकराची प्रतिक्रिया दिली नाही. राज ठाकरे हे चिपळूण च्या दौऱ्यावर असताना त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा देखील राज ठाकरे यांनी स्मितहास्य करत यावर प्रतिक्रिया देण टाळलं होतं. पण आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे.