मुंबईत मंगलप्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूना गृहसंकुलात पाय ठेवू देत नाहीत, त्यावर हे 'मटणवाले' बोलणार का? संजय राऊतांचा 'रोखठोक' प्रहार
शिवरायांचा इतिहास बदलणे आणि हिंदू मुसलमानांसाठी स्वतंत्र दुकानांची मागणी हा ठरवून सुरू असलेला मूर्खपणा भारतातला हिंदू पाकिस्तानच्या दिशेने ढकलत असल्याचा घणाघाती प्रहार संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत सुटलेल्या आणि दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशी जाहीरपणे वक्तव्य करत असलेल्या मंत्री नितेश राणे यांनी मटणावरून सुद्धा वाद सुरू केला आहे. त्यांच्या या वादावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामनातील रोखठोक या सदरातून कडाडून हल्लाबोल केला आहे. भारताची वाटचाल हिंदू पाकिस्तानच्या दिशेने असल्याचा प्रहार संजय राऊत यांनी आपल्या 'रोखठोक'मधून केला आहे. संजय राऊत यांनी मोदी शहाजी एक दिवस जाणारच आहे, पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील. गेल्या दहा वर्षात भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राज्य निर्माण झाली आहेत. हे वातावरण फाळणीसदृश्य आहे. शिवरायांचा इतिहास बदलणे आणि हिंदू मुसलमानांसाठी स्वतंत्र दुकानांची मागणी हा ठरवून सुरू असलेला मूर्खपणा भारतातला हिंदू पाकिस्तानच्या दिशेने ढकलत असल्याचा घणाघाती प्रहार केला आहे.
हे नवे 'मटणवाले' बोलणार का?
दरम्यान, संजय राऊत यांनी त्यांनी मटणावर सुरू असलेल्या वादावरून सुद्धा खडे बोल सुनावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मराठी कुटुंबांना घर नाकारणे मराठी भाषेवरून वाद निर्माण करणे, गुजराती भाषा दामटणे, विमा अर्जावर गुजराती भाषा छापणे असे सुद्धा प्रकार सुरूच आहेत. मुंबईत अनेक गृहसंकुलात मटण खाणाऱ्यांना हिंदूना जागा नाकारल्याचे प्रकार खूप घडत आहेत. या सर्व प्रकारावर हे नवे 'मटणवाले' बोलणार का? असा सवाल केला आहे.
लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूंना गृह संकुलात पाय ठेवू देत नाहीत
संजय राऊत आपल्या रोखठोकमध्ये म्हणतात, महाराष्ट्रात हिंदूंसाठी मटणाची वेगळी दुकाने, पण मुंबईत मंगल प्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटन खाणाऱ्या हिंदूंना त्यांच्या गृह संकुलात पाय ठेवू देत नाहीत. जागा नाकारल्या जात आहेत. त्यावर हे मटणवाले बालहिंदुहृदसम्राट बोलणार आहेत काय? भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुसलमान उतरले होते. अनेक मुसलमान क्रांतिकारक फासावर गेले. अनेक मुसलमान स्वातंत्र्ययोद्धे अंदमानच्या काळ्यापाण्याची शिक्षा भोगत होते. अनेकांना तेथेच मरण आले. त्यांचाही इंग्रजांनी छळ केला. मग मुसलमानांच्या रक्तातून मिळवलेल्या स्वातंत्र्यातून आजचे 'नव हिंदू मटम हृदयसम्राट' बाहेर पडणार आहेत काय? मुसलमानांचे योगदान मिळवलेल्या भारतात आम्ही श्वासही घेणार नाही असे सांगत ते कोणत्या राष्ट्रात जाणार? भारताच्या स्वातंत्र्यात व भारत निर्मिती शून्य योगदान असलेले लोक न्यूनगंडाने पछाडले आहेत आणि हिंदू मुसलमान अशी दोन राष्ट्रे पुन्हा निर्माण करीत आहेत हा डाव उधळून लावायला हवा.
ते पुढे म्हणतात की, महाराष्ट्रासह भारतात या हिंदुत्ववाद्यांनी पुन्हा औरंगजेबाला जिवंत केले. राजकीय स्वार्थ यामागे आहे. औरंगजेब महाराष्ट्रात गाडला गेला, त्याची माती झाली. मात्र, एखाद्या चित्रपटातला औरंगजेब पुन्हा समाजात उभा करणे हा शिवरायांचा सुद्धा अपमान आहे. श्रीमान योगींच्या प्रस्तावनेत प्राध्यापक नरहर कुरुंदकर सांगतात, औरंगजेब समजून घेतल्याशिवाय शिवराय नीट कळत नाहीत, पण या लोकांना शिवरायही कळत नाहीत. शिवरायांनी हिंदवी स्वराज्यासाठी पहिली लढाई केली ती चंद्रराव मोऱ्यांशी. त्या चंद्रराव मोऱ्यांचे वंशज भाजपमध्ये बहुदा महाराष्ट्रात सरकारत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
