Yugendra Pawar: युगेंद्र पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत? माळेगाव साखर कारखान्याची लढाई रंगतदार होण्याची शक्यता
Yugendra Pawar: लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आता 'माळेगाव' साखर कारखान्याच्या राजकीय आखाड्यात पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत रंगणार असल्याची चिन्हे आहेत.

बारामती: राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. राज्यातील दोन मोठे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये एकाच कुटूंबातील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले त्यामध्ये लोकसभेला मतदारांनी शरद पवारांना साथ दिली तर विधानसभेला अजित पवारांना साथ दिली त्यानंतर आता पुन्हा एकदा पवार विरूध्द पवार अशी लढत माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दिसण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा पवार विरूध्द पवार अशी निवडणूक होण्याचे संकेत दिसून येत आहेत.
काय म्हणालेत युगेंद्र पवार?
आमच्याकडे ना संस्था आहेत, ना सत्ता आहे आणि ना पैसा आहे. तरीही पक्षफुटीनंतर कार्यकर्ते आमच्यासोबत राहतात, ही सोपी गोष्ट नाही. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्हाला ठामपणे त्यांच्यामागे उभे राहावे लागेल. सक्षम उमेदवार मिळत असतील आणि माळेगावचा छत्रपती होऊ द्यायचा नसेल तर निवडणूक लढवावी लागेल, अशा शब्दांमध्ये युगेंद्र पवार यांनी माळेगाव कारखाना निवडणुकीच्या राजकीय मैदानात उतरण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर माळेगावमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत रंगण्याची शक्यता आहे.
बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना युगेंद्र पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यात शनिवारी माळेगावच्या काही सभासदांनी त्यांची भेट घेतली. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना युगेंद्र पवार म्हणाले, मागील दोन्ही निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठा पाठिंबा दिला. शरद पवार यांच्याकडे सभासद नेहमीच विविध प्रश्न घेऊन येतात.
माळेगावचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी आंदोलनावर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना युगेंद्र पवार म्हणाले, "ते आंदोलन आमच्या पक्षाचे नव्हते, मात्र आम्ही त्यास पाठिंबा दिला होता. सर्वपक्षीय सभासद त्या आंदोलनात सहभागी होते. त्यामुळे माळेगावच्या अध्यक्षांनी राजकारण आणू नये. निरा नदीत प्रदूषित पाणी सोडले जात आहे. उसाला योग्य दर मिळत नाही. कधी तरी एकदा चांगला दर दिला की त्याचेच कौतुक केले जाते. मग छत्रपतींनी 15 वर्षांपूर्वी दिलेला चांगला दरही वारंवार सांगायचा का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माळेगावच्या कार्यक्षेत्रातील खांडज ग्रामपंचायतीने दूषित पाण्यासंदर्भात ठराव पारित केला आहे. मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली. दूषित पाणी शेतीला दिल्याने आणि प्यायल्याने कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मासे मृत्युमुखी पडत आहेत आणि शेतकऱ्यांचे उत्पादन घटत आहे, असे ते म्हणाले. माळेगावचे अध्यक्ष माझ्या शरयू कारखान्याच्या दराबाबत बोलतात. मात्र, माझा कारखाना ज्या तालुक्यात आहे, तिथे आम्ही सर्वोत्तम दर देत आहोत. हा सहकारी नव्हे, तर खासगी कारखाना आहे आणि मी कर्ज काढून तो चालवत आहे. त्यांच्या नेत्यांचे सात-आठ खासगी कारखाने आहेत. मी जर बोलायला लागलो, तर त्यांना ते जड जाईल, असा इशारा पवार यांनी दिला. त्यामुळे आगामी काळात पवार विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आगामी निवडणुकांबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
