Majha Katta : कलावंत म्हणून काम करताना अनेकदा अशी उर्जा प्राप्त झाली की झपाटून काम केलं; प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सांगितला शिल्पप्रवास
Bhagwan Rampure On Majha Katta : चित्रकार व्हायला गेलेले भगवान रामपुरे हे शिल्पकार झाले आणि त्यांनी जगभरातील अनेक प्रसिद्ध पुतळे उभारले.
Bhagwan Rampure On Majha Katt : मूर्तीमध्ये कोणताही ईश्वर नसतो, त्याच्या भावामध्ये तो असतो, तुम्ही ज्या भावनेने पाहाल त्या भावनेने तुम्हाला परत मिळणार असतं, त्यामुळे मूर्तीचा भाव जाणणं महत्त्वाचं असतं असं प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुर यांनी सांगितलं. सोलापुरातून दहावी पास झालो आणि चित्रकार व्हायला जेजे स्कूलमध्ये गेलो, पण तिथे शिल्पकार झालो असं सांगत भगवान रामपुरे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. भगवान रामपुरे (Majha Katta) यांनी आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात उपस्थिती लावली. भगवान रामपुरेंना घडवलेल्या पुतळ्यांचे आज जगभर कौतुक केलं जातंय.
प्रवासातील कोणता टप्पा आव्हानात्मक
भगवान रामपुरे आपल्या प्रवासाबद्दल सांगताना म्हणाले की, वडील माझे गुरू, ते गणपतीच्या मूर्त्या करायचे. पण ते सोडून गेल्यानंतर मोठ्या भावाने साथ दिली. मी माझ्यासाठी गणपती करायचो आणि विकायचो. 13 व्या वर्षी एका न्यूड फोटोचे शिल्प तयार केलं, ते माझे पहिलं शिल्प होतं. पण त्यावेळी शिक्षणामध्ये मन रमत नव्हतं. त्यामुळे दहावीला नापास झालो. मी चित्रकार होणार असं बाबांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की पहिला दहावी पास व्हावं लागेल. मग अभ्यास केला आणि पास झालो. त्यानंतर चित्रकला शिकण्यासाठी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला प्रवेश घेतला.
जेजे मध्ये शिल्पकलेकडे वळलो
चित्रकार व्हायला गेलेले रामपुरे शिल्पकार कसे झाले असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, जेजेला प्रवेश घेतल्यानंतर त्या ठिकाणी पेंटिग करायचो, पण जेजेमधील एका शिक्षकाने सांगितलं की पेंटिंगपेक्षा शिल्पकला चांगली आहे. हे त्यांनी 1982 साली सांगितलं होतं. त्यानंतर आपण शिल्पकलेकडे वळलो. तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला.
गणपतीच्या शिल्पाने जीवन बदललं
एका गणपतीच्या शिल्पाने आपलं जीवन बदललं असल्याचं सांगत भगवान रामपुरे म्हणाले की, कावासाकीसाठी बनवण्यात आलेल्या चित्यामुळे मोठं नाव झालं. त्यानंतर मुंबईमध्ये एक स्टुडिओ सुरू केला. एका आईचं एक पोर्ट्रेट केलं, ते माझं पहिलं पोट्रेट होतं. गणपतीचा पोर्ट्रेट तयार केला होता, त्यावेळी एका व्यक्तीला तो दिला. दुसऱ्या दिवशी त्याचा परत फोन आला, आणि 200 पीसची मागणी केली. रामपुरे आर्टच्या माध्यमातून त्याची विक्री करायचं ठरलं. त्या व्यक्तीला 200 पीस दिले आणि आणखी 500 पीस दिले. त्या गणपतीने असा काही चमत्कार केला की त्यानंतर अनेक हजारो ऑर्डर्स आल्या. काहींच्या ऑर्डर या एक हजार, पाच हजार अशा होत्या. 1994 पर्यंत मी एकटाच करायचो. नंतर त्या टाईपने अनेक कॉपी करण्यात आल्या. या गणपतीच्या शिल्पाने मला घर मिळालं, गाडी मिळाली आणि पैसा, नाव मिळालं.
मीराच्या मनातला श्रीकृष्ण साकारला
कलावंत म्हणून काम करताना अनेकदा अशी उर्जा प्राप्त झाली की झपाटून काम केलं असं सांगताना भगवान रामपुरे म्हणाले की, मीराचे शिल्प मी साकारत होतो. एक प्रसंग समोर आला. मीरा भजन करताना तिला देहाचंही भान राहिलं नाही, ती भगवान श्रीकृष्णामध्ये विलीन झाली. मग श्रीकृष्णाचं शिल्प साकारताना गणपतीचे निराकार शिल्प समोर आलं. त्या गणपतीचे शिल्प जसं होतं तसंच केलं. श्रीकृष्ण साधा उभा केला. पण तीन चार वर्षानंतर अचानक पहाटे वही पेन घेतलं आणि निराकार गणेश आणि श्रीकृष्णाचे चित्र काढलं.