छोटा गाभारा, त्यात VVIP ची गर्दी, आता मुख्यमंत्र्यांचं 10 पालखीप्रमुखांना निमंत्रण, आषाढीच्या पूजेबाबत शिंदेंना फेरविचार करावा लागणार?
शासकीय पूजा व व्हीआयपी पासेसचे दर्शन संपताना सकाळी सहापासूनच सर्वसामान्य भाविकाला दर्शन सुरु होते. अशावेळी केवळ 16 तासात दर्शनासाठी आलेल्या 15 लाख भाविकांवर हा थेट अन्याय ठरतो

सोलापूर : लोकसभेतील (Lok Sabha Election) दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वारकऱ्यांसाठी लोकप्रिय निर्णय घेताना ऐन महापूजेत मानाच्या 10 पालखी प्रमुखांना स्थान देण्याची घोषणा केली खरी मात्र आता एकादशी दिवशी त्यांना त्यांच्याच राजकीय सहकाऱ्यांची नाराजी ओढवावी लागणार आहे . खरे तर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री आणि तमाम वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मानाचे वारकरी दाम्पत्य यांना आषाढी एकादशीच्या महापूजेत (Ashadhi Ekadashi Pooja) स्थान देण्याची पद्धत रूढ झाली आहे . आषाढी सोहळ्यासाठी देशभरातून शेकडो पालखी सोहळे पंढरपूरकडे येत असतात. आषाढी सोहळ्यात पूर्वी केवळ सात मानाच्या पालख्या म्हणून वारकरी संप्रदाय मान्यता देत आला आहे. यानंतर तीन पालखी सोहळे राजकीय हस्तक्षेपानंतर यात वाढविण्यात आले. आजवर हे सर्व मानाचे पालखी सोहळ्यांना मंदिर समितीकडून एकादशी दिवशीचे शेकडो दर्शन पासेस देण्यात येत असतात. असे असताना यंदा मुख्यमंत्र्यांनी या 10 मानाच्या पालखी सोहळ्यातील पालखी प्रमुख व सोहळा प्रमुख अशा प्रत्येकी दोघांना महापूजेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे .
वास्तविक विठुरायाच्या गाभारा आकाराने एवढा लहान आहे की पूजेच्यावेळी मुख्यमंत्री दाम्पत्य,मानाचे वारकरी दाम्पत्य आणि देवाचे पुजारी कसेतरी उभे राहू शकतात . त्यामुळे जरी या पालखी सोहळा प्रमुखांना सहभागी करून घेतले तरी त्यांना ही महापूजा इतर व्हीआयपी सारखे सोळखांबी मध्ये बसूनच पाहावी लागणार आहे . विठ्ठलाच्या गाभाऱ्याबाहेर एक चौखांबी असून येथे कसेतरी 10 ते 15 भाविक बसू शकतात . उरलेल्या भाविकांना त्याच्या बाहेर असणाऱ्या सोळखांबी मध्येच बसून महापूजा पाहावी लागत असते . एकतर या पालखी सोहळा प्रमुखांना महापूजेत सहभागी म्हणजे प्रत्यक्ष पूजा करण्यास मिळणार असे वाटत आहे . त्यामुळे हे शक्य नसल्याने एकाबाजूला या पालखी सोहळा प्रमुखांची नाराजी महापूजेनंतर समोर येणार आहे.
इतर पालखी आक्रमक होण्यास सुरुवात
दुसऱ्या बाजूला मंदिर महापूजेसाठी चौखांबी आणि सोळखांबीमध्ये 50 ते 60 भाविक थांबू शकतात. आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी राज्यातील आमदार खासदार, मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी असते. यातच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत येणाऱ्यांची संख्या पाहता महापूजेस उपस्थित राहणाऱ्या व्हीआयपी संख्या 200 पेक्षा जास्त असते. अशावेळी गर्दीचा त्रास मोठ्या प्रमाणात मुख्य व्हीआयपी लोकांना सहन करावा लागतो. आता गर्दीवर मर्यादा घालायच्या झाल्यास कोणाला घ्या आणि कोणाला नको हे सांगणे मुख्यमंत्र्यांना अवघड जाणार आहे .आता तर सामाजिक संघटनांनीही आम्हाला आषाढी महापूजेस उपस्थित राहण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यास सुरुवात झाल्याने यात वाईटपणा दोन्ही बाजूने मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागणार असून सोसावी लागणारी नाराजी चा फटका देखील लोकप्रिय निर्णयाच्या नादात सरकारला सोसावा लागणार आहे .आता इतर पालखी सोहळे देखील आक्रमक होण्यास सुरुवात झाली असून देवापाशी सर्व भक्त सारखे असल्याची भूमिका घेऊ लागले आहेत .
व्हीआयपी दर्शनामुळे 15 लाख भाविकांवर अन्याय
यामुळे आषाढी एकादशी दिवशी व्हीआयपी दर्शन पासांची संख्या वाढली जाईल आणि दर्शन रांगेत 40 - 40 तास उभारणाऱ्या भविकाला आषाढीच्या पर्वणीला दर्शन मिळणे दुरापास्त होणार आहे. आषाढी एकादशीचा पर्वणी काळ हा दशमी रात्री दोन ते एकादशी रात्री 12 पर्यंत मानला जातो. शासकीय पूजा व व्हीआयपी पासेसचे दर्शन संपताना सकाळी सहापासूनच सर्वसामान्य भाविकाला दर्शन सुरु होते. अशावेळी केवळ 16 तासात दर्शनासाठी आलेल्या 15 लाख भाविकांवर हा थेट अन्याय ठरतो . खरेतर शासकीय पूजेचा वेळ कमी करून आणि व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केल्यास वाचणाऱ्या तीन ते चार तासात मिनिटाला 45 या वेगाप्रमाणे हजारो भाविकांना एकादशीच्या पर्वणीला दर्शन मिळू शकणार आहे .
हे ही वाचा :
Ashadhi Wari 2024 : मोठी बातमी : यंदा आषाढी एकादशीला विठुरायाच्या महापूजेचा मान...; मुख्यमंत्र्यांचा पालख्यांबाबत मोठा निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
