Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Beed news Balaji Tandle: संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांसाठी बालाजी तांदळेने साहित्य पुरवल्याचा आरोप. बालाजी तांदळे आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी करताना दुकानामध्ये दिसतो आहे.
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास निर्णायक वळणावर असताना आता आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे सहकारी आणि कारेगावचे सरपंच बालाजी तांदळे (Balaji Tandle) यांचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या फुटेजमध्ये बालाजी तांदळे हे एका दुकानातून ब्लँकेट खरेदी करताना दिसत आहेत. हेच ब्लँकेट पोलीस कोठडीत असलेल्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना देण्यात आल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.
बीड शहर पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांना बालाजी तांदळे याने धमकावल्याचा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता. त्याच बालाजी तांदळेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये बालाजी तांदळे आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी करताना दुकानामध्ये दिसतो आहे. बालाजी तांदळे याने सीआयडी ऑफिसर असल्याची बतावणी करत बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मीक कराडला भेटण्यासाठी एन्ट्री केली होती. यावेळी तो वाल्मीक कराड याला भेटला देखील असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता. तर यावेळी बालाजी तांदळे याने सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून धमकावल्याची तक्रार देखील धनंजय देशमुख यांनी केली होती.
याच बालाजी तांदळेने आरोपी विष्णू चाटे याला पाण्याच्या बॉटल्स न्यायालयात दिल्याचे समोर आले होते. आता विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांना गेवराईच्या पोलीस कोठडीत ठेवले होते. त्यादरम्यान त्यांना लागणारे साहित्य बालाजी तांदळेने एका दुकानातून खरेदी केले. याचाच हा सीसीटीव्ही समोर आलाय. आणि हे पोलीस कोठडीत असलेले आरोपी साठीच ब्लँकेट घेतले होते, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे आता बालाजी तांदळे याला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार का, हे पाहावे लागेल. कोठडीतील आरोपींना ब्लँकेट पुरवल्याची बाब सिद्ध झाल्यास बालाजी तांदळे याच्या अडचणी वाढू शकतात.
मुंबईत जनआक्रोश मोर्चा
संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्याय मागण्यासाठी रविवारी मुंबईत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. तिने म्हटले की, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं नाही. मात्र, वाल्मिक कराडच्या पोटात दुखायला लागलं की त्याला लगेच दवाखान्यात घेऊन जातात, अशी खंत वैभवी देशमुख हिने बोलून दाखवली.
आणखी वाचा