Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Raj Thackeray : राज ठाकरे हे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले होते. मात्र आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे परतले आहेत.
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे गुरुवारी (दि. 23) नाशिक (Nashik News) दौऱ्यावर आले होते. विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) दारूण पराभवानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच पक्षातील अंतर्गत नाराजी, कुरघोडी, गटबाजी करणार्यांना राज ठाकरे यांनी समज दिली होती. राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसेत फेरबदलाचे संकेत दिसून येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील मनसेच्या बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनसेत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाजतील बंडाळी अधिक उफाळून येऊ नये यासाठी रा ठाकरेंनी नाशिकला धाव घेतली होती. गुरुवारी नाशिकमध्ये राज ठाकरेंनी पक्षातील निवडक पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांनी पक्षसंघटनेचा आढावा घेतला होता.
राज ठाकरे भाकरी फिरवणार?
पक्षातील अंतर्गत नाराजी, कुरघोडी, गटबाजी करणाऱ्यांना राज ठाकरे यांनी समज दिली होती. मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शुक्रवारी राज ठाकरे मुंबईला रवाना झाले होते. राज ठाकरे हे तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आले होते. मात्र ते एकाच दिवसात मुंबईला परतले. यानंतर नाशिकसह अनेक ठिकाणी मनसेच्या पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात पक्षात हालचाली सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत फेरबदलाचे संकेत मिळत असून मनसेत भाकरी फिरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवयानी फरांदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
दरम्यान, राज ठाकरे हे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांनी भेट घेतली होती. नाशिक मध्य मतदारसंघात मनसेने विधानसभा निवडणुकीत उमेदवार मागे घेतला होता. याचा देवयानी फरांदे यांना फायदा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे देवयानी फरांदे यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट नाशिकमध्ये चर्चेत आली आहे. राज ठाकरेंच्या भेटीनंतर देवयानी फरांदे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले आहेत. त्यामुळे मी त्यांची भेट घेतली. आगामी सिंहस्थ, नाशिकचा विकास या विषयांवर राज ठाकरेंशी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या