Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Bharat Gogawale on ST Fare Hike : एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरुन भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Bharat Gogawale : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं (MSRTC) एसटीच्या भाड्यात वाढ (ST Fare Hike) करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार एसटीच्या भाड्यात 14.95 टक्के वाढ होणार आहे. ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासूनच (25 जानेवारी) लागू होणार आहे. आज शनिवारी 25 जानेवारीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा भार येणार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता यावर रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
भरत गोगावले म्हणाले की, आपल्याला चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे आहे. कारण एसटी महामंडळ दर महिन्याला 50 कोटी रुपये तोट्यात जात आहे. तसेच चालक, वाहक यांच्या पगारात वाढ होत असल्याने असे निर्णय घ्यावे लागतात. यासाठीच भाडेवाढ करावी लागते. तुम्हाला चांगल्या सुविधा देखील आमच्याकडून दिल्या जातील, असे त्यांनी म्हटले आहे.
नवीन दर पुढीलप्रमाणे :
एसटीमधून प्रवास करताना प्रति टप्पा 6 किमीसाठी भाडे आकारले जाते. साध्या बसचे सध्याचे भाडे 8.70 रुपये आहे, ते आता 11 रुपये असेल. जलद सेवा (साधारण) आणि रात्र सेवा (साधारण बस) याचेही भाडे सारखेच असणार आहे. निमआरामसाठी 11.85 रुपयांऐवजी 15 रुपये मोजावे लागतील. शिवशाही (एसी) बसचे भाडे 12.35 वरून 16 रुपये झाले आहे. तर शिवशाही स्लिपरसाठी (एसी) 17 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच शिवनेरीचे (एसी) भाडे 18.50 ऐवजी 23 रुपये झाले आहे. तर शिवनेरी स्लिपरचे भाडे 28 रुपये आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे.
काय म्हणाले परिवहन मंत्री?
एसटीच्या तिकीट दरात वाद होणार असल्याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, वाढलेली महागाई, वाढते इंधन दर यामुळे एसटीवर जवळपास 3 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. प्रत्येक वर्षी विशिष्ट दरवाढ करणे अपेक्षीत असते मात्र मागील काही वर्षांपासून दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या