RTMNU : नागपूर विद्यापीठातील कथित ब्लॅकमेल प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? धर्मेश धवनकर यांच्याकडून अजूनही नोटीसला उत्तर नाही
विशेष म्हणजे धवनकर यांना दिलेली वाढीव मुदतही संपली आहे. त्यामुळे या प्रकरणात विद्यापीठ प्रशासन गंभीर नसून हे प्रकरण थंडबस्त्यात टाकण्याचाच प्रयत्न सुरु असल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे.
Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील (RTMNU) सात विभागप्रमुखांना मुलींची तक्रार असल्याचे सांगून ब्लॅकमेल करत लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोपासंदर्भात प्रशासनाने पाठविलेल्या नोटीसला अद्याप जनसंवाद विभागाचे सहायक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी उत्तर दिलेले नाही. विशेष म्हणजे नोटीसनंतर दिलेली वाढीव मुदतही संपली आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणात विद्यापीठ प्रशासन फार गंभीर नसून हे प्रकरण थंडबस्त्यात टाकण्याचाच प्रयत्न सुरु असल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतरपासून विद्यापीठ (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. मात्र माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्यानंतर कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी धवनकर यांना नोटीस जारी करुन तीन दिवसांत खुलासा मागितला होता. ही मुदत संपली तरी धवनकर यांच्या विनंतीनुसार चार दिवसांची पुन्हा मुदत देण्यात आली होती. ही मुदतही आता संपली आहे. परंतु उत्तर आलेले नाही. यासंदर्भात विद्यापीठातील सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप उत्तर आलेले नसल्याची माहिती दिली.
प्राप्त माहितीनुसार यावर कारवाईचा निर्णय कुलगुरु घेऊ शकतात. मात्र धर्मेश धवनकर हे कुलगुरुच्या जवळचे असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुलगुरुंनी गठित केलेल्या चौकशी समितीमधील एका सदस्याबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यांनी आपले नाव समितीतून मागे घेतले असल्याची माहिती आहे. आता त्या सदस्याऐवजी कोणाला समितीत स्थान द्यावे हा निर्णयही कुलगुरु घेणार असल्याची माहिती आहे. तसेच लवकरच समितीची जबाबदारी एखाद्या वकिलाला देण्यावर विचार सुरु असल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
नवीन वर्षात पंतप्रधान लावणार हजेरी
नागपुरात 1974 नंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे (इंडियन सायन्स काँग्रेस) आयोजन करण्यात आले आहे. 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला (Nagpur University) मिळाले आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे हे प्रकरण दोन महिने थंडबस्त्यात ठेवण्यात येणार असल्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी भारतातील प्रमुख शहरामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे (Indian Science Congress) या परिषदेचे आयोजन केले जाते. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र पर्यावरण माहिती तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र, अशा 14 विविध विभागांवर नवनवीन शोध प्रबंध, भव्य प्रदर्शनी, मार्गदर्शन आणि यामध्ये तज्ञांचा सहभाग, अशी विज्ञानाला समर्पित व्यापकता या संमेलनाची असते.
ही बातमी देखील वाचा