Dhiraj Sahu IT Raid: काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरी सापडला 'कुबेराचा खजिना', भाजपने पुन्हा साधला राहुल गांधींवर निशाणा
Dhiraj Sahu IT Raid: काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले. यावेळी आयकर विभागाला त्यांच्या घरी मोठी मालमत्ता सापडल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : काँग्रेसचे (Congress) राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू (Dhiraj Prasad Sahu) यांच्या घरातून 300 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने (Income Tax) अनेक दिवसांपासून साहू यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकून रोख रक्कम जप्त केली. यावरुन भाजपने (BJP) आता काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केलीये. भाजपने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आणि म्हटले की, कायदा धीरज साहू यांना जबाबदार धरेल आणि त्यांची पाठ सोडणार नाही.
आयकर विभागाने ओडिशातील बालंगीर येथील धीरज साहू यांच्या भावाच्या मालकीच्या डिस्टिलरी कंपनीच्या जागेवर छापा टाकला. याठिकाणाहून आयकर विभागाने 300 कोटींहून अधिक रोख रक्कम वसूल केली. सध्या आयकर विभागाची शोध मोहिस सुरु आहे. दरम्यान मागील सहाव्या दिवसापासून आयकर विभागाची ही कारवाई सुरु आहे. त्याचप्रमाणे रविवार 10 डिसेंबर रोजी नोटा मोजण्यासाठी नवीन मशीन देखील मागवण्यात आले. सुरुवातीला कपाटात अडकून ठेवलेल्या नोटा मोजण्यासाठी मशीनची कमतरता होती. काही मशिन्स बिघडल्या असल्याची माहिती समोर आली होती.
कायदा तुमची पाठ सोडणार नाही - भाजप
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, भाऊ, तुम्हाला आणि तुमचे नेते राहुल गांधी दोघांनाही उत्तर द्यावे लागेल. हा नवा भारत आहे, इथे राजघराण्याच्या नावाखाली लोकांचे शोषण होऊ देणार नाही. तुम्ही धावून थकून जाल, पण कायदा तुम्हाला सोडणार नाही. जर काँग्रेस भ्रष्टाचाराची हमी असेल तर मोदीजी भ्रष्टाचारावर कारवाईची हमी आहेत, जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करावा लागेल.
माहितीच्या आधारे झाली कारवाई
आयकर विभागाने बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवर छापे टाकून 300 कोटींहून अधिक रोख जप्त केली. दरम्यान ही रक्कम 350 कोटींपेक्षाही अधिक असू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. साहू कुटुंबाकडे देशी दारू तयार करणारी डिस्टिलरी आहे.
आयकर विभागाला साहू यांच्या प्रत्येक व्यावसायाशी संबंधित गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली. 300 कोटींपैकी 250 कोटी रुपये बोलंगीर येथील कंपनीच्या आवारातील अनेक कपाटांमधून जप्त करण्यात आले आहेत.