Dattatray Bharne & Nitesh Rane: मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल! मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना अजितदादांच्या मंत्र्याने सुनावलं
Dattatray Bharne at Indapur: प्रदीप गारटकर आणि दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे डावे उजवे हात आहेत. त्यामुळे इंदापूरचा खूप विकास होईल, असे वक्तव्य आमदार माधुरी मिसाळ यांनी आपल्या भाषणात केले.

इंदापूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुस्लीम समाजाविरोधात आगपाखड करत सुटलेले भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांना आता महायुतीमधूनच विरोध होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी अप्रत्यक्षपणे नितेश राणे यांना खडे बोल सुनावले आहेत. इंदापूरकर खूप वेगळी माणसं आहेत. निवडणुका संपल्यावर जोडे बाजूला ठेवायचे असतात. आज मुस्लिम समाजाबद्दल (Muslim) काही ठिकाणी चुकीचा प्रचार केला जात आहे. इंदापूर तालुक्यातील मुस्लिम माणसांनी नेहमी चांगल्या विचाराला माणसाला साथ दिली आहे. मंत्रीपद हे रुबाब करण्यासाठी नसते. पण काळ तुम्हाला उत्तर देईल. अल्पसंख्यांक लोकांनी गैरसमज दूर करा. खरं काय खोटं काय ते पाहा, अशी टिप्पणी दत्तात्रय भरणे यांनी केली. त्यांच्या या टीकेचा रोख नितेश राणे यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.
इंदापूरमध्ये रविवारी राज्यमंत्री माधुरी मिसाळ भव्य नागरी सन्मान करण्यात आला होता. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि माधुरी मिसाळ उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, आज अनेक वक्ते बोलले बरं वाटलं, असंच सर्वांनी बोलल्यावर इंदापूर कुठल्या कुठे जाईल. आज एक वेगळा योग आहे.पुणे तिथे काय उणे. मी वेळेला महत्त्व देणारा माणूस आहे. चहा पितो पण योग्य वेळी. माधुरी मिसाळ यांची काम करण्याची पद्धत मी नेहमी डोळ्याने पाहत असतो. त्यांचं सासर पुण्यातलं असलं तरी माहेर इंदापूर असल्याचा उल्लेख दत्तात्रय भरणे यांनी केला.
इंदापूरचे लोक ढोंग्यांना महत्त्व देत नाहीत, भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला
2009 साली मी निवडणूक लढण्यास तयार नव्हतो, पण कार्यक्रम झाला. इंदापूरची माणसं फार हुशार आहेत.ढोंग करणाराला शो करणाऱ्याला महत्त्व देत नाहीत.मी कमी वाजवतो पण इंदापूरची लोक योग्य ते करतात, असा टोला मंत्री भरणे यांचा हर्षवर्धन पाटलांना नाव न घेता लगावला. लाडक्या बहिणीमुळे शासकीय तिजोरीवर थोडा ताण आहे, हे मान्य करावं लागेल. त्यामुळे थोडी पत्रं द्यायची कमी करा. पण निधी कुठून कसा आणायचा मला चांगला माहिती आहे. राज्यमंत्र्यांनी फक्त थोडी फाईल कुठे थांबवायची असते, कारण कॅबिनेट मंत्री आम्ही असतो. नाहीतर राज्यमंत्री सुद्धा चांगलं काम करू शकतो, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले.
गारटकर आणि भरणे अजितदादांचे लेफ्ट-राईट हँड, इंदापूरचा विकास पक्का: माधुरी मिसाळ
प्रदीप गारटकर आणि दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे डावे उजवे हात आहेत. त्यामुळे इंदापूरचा खूप विकास होईल, असे वक्तव्य आमदार माधुरी मिसाळ यांनी आपल्या भाषणात केले. इंदापूरला नेहमीच येत होते, पण आज नागरी सत्कार मिळण्याच भाग्य लाभले. यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते म्हणतात. या सत्काराला काय उत्तर द्यायचे मी याचा विचार करत होते. राज्यात कुठेही गेले तरी मला माणसं भेटतात की, सतीश भाऊंनी आमच्यासाठी हे केलं, ते केलं सांगतात, तेव्हा अभिमान वाटतो, हा माणूस माझा नवरा होता. एक दिवस जात नाही की, मला सतीश शेठची आठवण येत नाही. त्याची पुण्याई अशी की, 22 वर्षे त्याचे सर्व मित्र माझ्यासोबत राहिले.
माझ्या नवऱ्याला लोक संग्रह करायची फार आवड होती. त्यामुळे नाश्तापासून ते जेवणापर्यंत लोक माझ्याकडे असायचे. सतिशची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी बाहेर पडले. पहिली निवडणूक होती तेव्हा पहिला मित्र परिवाराने मेळावा घेतला. तेव्हा पहिला फॉर्म राष्ट्रवादीच्या नेत्याच्या गाडीतून जाऊन भरला. गारटकर त्यावेळी नक्की आमदार झाले असते. विठ्ठल तुपे खासदार होते तेव्हा भवानी पेठेत दंगल झाली होती. तेव्हा तिथे पोलिस जाऊ शकत नव्हते. तिथे स्वर्गीय सतीश मिसाळ घुसले आणि सर्वांना बाहेर आणले. त्याने कधीही कुठलाही जात-धर्म मध्ये आणला नाही.
राजकारण करताना नेत्याच्या ताकदीवर करु नका, तर स्वतःची ताकद निर्माण करा. आज माझ्याकडे खूप खाती आहेत. लोक खूप अपेक्षेने येतात, त्यामुळे खूप सारी कामे आपण करू शकतो की नाही याबाबत मला शंका येते. मी कोणाला आश्वासन देत नाही,काम होणार असेल तर होणार नसेल होणार तर नाही सांगते. पुढे पक्ष संधी देईल तोपर्यंत काम करेन, असे माधुरी मिसाळ यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

