Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लॉबीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समोरासमोर आले. यावेळी त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, असा टोला लगावला.

Maharashtra Budget 2025 : महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (10 मार्च) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला. राज्याचे अर्थमंत्री म्हणून हा अकरावा अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला. अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर विधानसभेच्या लॉबीमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.
काय, तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही?
यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस समोर आल्यानंतर दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी खोचक टोला लगावला. काय, तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यानंतर मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा हसले. यानंतर देवेंद्र फडणवीस नमस्कार करून पुढे निघाले
दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही
दुसरीकडे, अजित पवार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लॉबीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समोरासमोर आले. यावेळी त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, असा टोला लगावला.
आमनेसामने आले, पण नजरेला नजर नाही
याचवेळी एकनाथ शिंदे चर्चा सुरू असताना सभागृहातून बाहेर आले. लॉबीमधून जात असताना देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू असताना तिकडे नजर नजरही न मिळवता ते पुढे निघाले. उद्धव ठाकरे दुसऱ्या मजल्यावरून लिफ्टमधून लॉबीमध्ये आले, तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे पहिल्या मजल्यावर लॉबीमध्ये आले होते.
मुख्यमंत्री लाडकी बहिणसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद
दरम्यान, 2025-26 पर्यंत 1500 किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-3 अंतर्गत, 5,670 कोटी रुपयांची 6,500 किमी लांबीची कामे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 3,785 किमी लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिणसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी पूर्वी 23 हजार 232 कोटी रुपये होती. निवडणुकीदरम्यान महायुतीने 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये दरमहा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, 1500 रुपये मिळणार आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांतील 7,210 गावांमध्ये राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी 2025-26 या वर्षात 351 कोटी 42 लाख रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2 लाख 13 हजार 625 लाभार्थी शेतकऱ्यांना पुढील दोन वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























