Manikrao Kokate : न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मूर्खपणा; माणिकराव कोकाटे पत्रकारांवर भडकले, नेमकं काय घडलं?
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाच्या निकालावर विरोधकांकडून होणाऱ्या टिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याच्या संदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची होणारी कारवाई टळली आहे. मात्र, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना जे निरीक्षण नोंदवलेले ते निरीक्षण आता चर्चेत आले आहे. माणिकराव कोकाटे यांना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायलयाने निरीक्षण नोंदवल्यानंतर विरोधकांनी यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता याबाबत माणिकराव कोकाटे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवरच संतापल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाच्या निकालावर विरोधकांकडून होणाऱ्या टिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर माणिकराव कोकाटे संतापल्याचे पाहायला मिळाले. निकाल अद्याप लागलेला नाही, स्थागिती देण्यात आली आहे. विरोधक, मिडीयाकडून तेच तेच सुरु आहे. न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे हा मुर्खपणा असून राजकीय षडयंत्र विरोधकांकडून सुरु असल्याचे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी संताप व्यक्त केलाय.
जमीन कमी होतेय, हे मला मान्य : माणिकराव कोकाटे
दरम्यान, राज्यातील शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटत असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत देशभरात 6.42 लाख हेक्टर शेतीयोग्य जमीन कमी झाली असून, यातील 3.25 लाख हेक्टर जमीन महाराष्ट्रातूनच नाहीशी झाली आहे. याबाबत विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, रस्ते, पाटबंधारे, मार्केट कमिटी, अशा विविध प्रकल्पांसाठी जमीन लागत असते. या गोष्टी हवेत होऊ शकत नाही. त्यामुळे जेवढी प्रगती कराल जेवढ्या गोष्टी कराल तेवढ्या जमिनी उपलब्ध करून द्याव्या लागतील. त्यादृष्टीतून तेवढी जमीन कमी होणं माझ्या दृष्टीने साहजिकच आहे. आता कामे थांबवू शकत नाही, समृद्धी हायवे थांबवू शकत नाही, नव्याने शक्तिपीठ महामार्ग होत आहे. जमीन कमी होत आहे, ही गोष्ट मला मान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

