Maha Minister : ’11 लाखांची पैठणी मी देणार नाही!’, आदेश भाऊजींचे ट्रोलर्सना खडे बोल!
Home Minister : नुकतंच होम मिनिस्टरचं नवीन पर्व महामिनिस्टर हे प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून, या पर्वाच्या विजेतीला तब्बल 11 लाखांची पैठणी मिळणार आहे.

Home Minister : होम मिनिस्टर (Home Minister) हा झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम गेली 18 वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आला आहे. इतकंच नव्हे, तर महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतभरातील वहिनींचा सन्मान करून या शोने त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं आहे. नुकतंच होम मिनिस्टरचं नवीन पर्व महामिनिस्टर हे प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून, या पर्वाच्या विजेतीला तब्बल 11 लाखांची पैठणी मिळणार आहे. सोन्याची जर आणि हिरे जडलेल्या या पैठणीची चर्चा सगळीकडे सुरु असताना अनेक ट्रोलर्सने त्याबद्दल ट्रोलिंगसुद्धा सुरु केलं आहे.
सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला नुकतेच एका मुलाखतीत आदेश बांदेकरांनी खडे बोल सुनावले आहेत. आदेश बांदेकर याबद्दल म्हणाले की, ‘जे 11 लाखांच्या पैठणीवरून मला किंवा वाहिनीला ट्रोल करत आहेत, त्यांना कदाचित माहिती नाही आहे की, ती मी देणार नाही आहे. ती पैठणी प्रयोजकांकडून येते. झी मराठी या वाहिनीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आणि मी या कार्यक्रमाचा निवेदक आहे. हे समीकरण ज्यांना कळत नाही, तिथेच त्या ट्रोलिंगकडे गांभीर्याने बघण्याचा विषय संपतो. तसंच, गेली 18 वर्ष सतत हा कार्यक्रम सुरु आहे. म्हणजेच दररोज 1 पैठणीच्या हिशोबाने जवळपास साडेपाच हजारापेक्षा जास्त पैठण्या या कार्यक्रमातून वहिनींना मिळाल्या आणि त्यामागे जो विचार आहे, तो काहींना कळत नाही त्यामुळे हे ट्रोलिंग होतं.’
बनवणारे हात लाखमोलाचे!
आदेश बांदेकर म्हणले, ‘11 लाखांची पैठणी ही येवलेमध्ये बनतेय आणि ही पैठणी बनवणारे कारागीर जे आहेत ते मूकबधिर आहेत. त्यामुळे पैठणीची किंमत 11 लाख असली, तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतोय. हा चांगला उद्देश अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नसेल, त्यामुळे हे ट्रोलिंग होतंय. पण, या पैठणीपेक्षा हे कारागिरांचा आणि वहिनींचा आनंद हा लाखमोलाचा आहे.’
यंदाचं पर्व असणार खास!
‘महामिनिस्टर’चं पर्व महाराष्ट्रातील 9 सेंटर्समध्ये रंगणार आहे. यात प्रत्येक सेंटरवर ऑडिशन घेऊन त्यातून 100 महिलांची निवड केली जाईल. या 100 महिलांसोबत सोमवार ते रविवार, या एका आठवड्यात अनेक खेळ खेळले जातील. यातील एकीची निवड या ‘सेंटरची विजेती’ म्हणून होईल. 100 महिलांमधून विजयी ठरलेल्या महिलेला सव्वा लाखांची पैठणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. यानंतर एकूण 9 सेन्टर्सच्या विजेत्यांसोबत या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. यात विजेती ठरणाऱ्या वहिनीस तब्बल 11 लाखांची सोन्याचे वर्क असलेली पैठणी मिळणार आहे.
हेही वाचा :
- KGF 2 : हिरो बनायला आला अन् डबिंग आर्टिस्ट म्हणून गाजला! वाचा ‘रॉकी भाई’ला आवाज देणाऱ्या ‘त्या’ मराठमोळ्या व्यक्तीबद्दल...
- Mukta Barve : ‘पुण्यावर पुन्हा एकदा एक भयंकर संकट कोसळलंय’, अभिनेत्री मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत!
- रंगभूमीवरील ऐतिहासिक सुवर्ण पान, ‘रायगडा’वरच रंगला ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकाचा दमदार प्रयोग!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
