मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पाहणी दौरा केला.

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची (Leopard) सफारी सुरु होणार असून आज राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ऍड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबत घोषणा केली. तसेच, या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत. बिबट्याची सफारी सुरू करण्यासंदर्भात त्यांनी वन विभागाला सूचना केल्या असून प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे, आगामी काळात येथील पर्यटकांना बिबट्याचे दर्शन घडणार आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पाहणी दौरा केला. यावेळी उपनगराचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन, उपसंचालक रेवती कुलकर्णी, सहाय्यक वनरक्षक सुधीर सोनवणे, मुख्य सुरक्षा अधिकारी योगेश महाजन आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ आणि सिंहाच्या दोन सफारी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात बिबट्यांचे सापडलेले बछडे याच उद्यानात संरक्षित करण्यात आलेले आहेत. त्यांचे पालन करण्यात येते आहे. मात्र, पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांची सफारी उपलब्ध नाही. त्यासाठी सुमारे तीस हेक्टर जागा लागणार असून ही जागा या क्षेत्रात उपलब्ध आहे. तर सफारीसाठी प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 5 कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात 20 लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी मंत्र्यांसमोर सादरीकरण केले.
दरम्यान, याबाबत आढावा घेतल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी या क्षेत्रात नवी बिबट्याची सफारी सुरू करा, त्यासाठी लागणारा निधी वन खात्याकडून आणि जिल्हा नियोजन समितीमधून आम्ही देऊ, असे त्यांनी सांगितले. तातडीने याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
"भारत, भारती"ला पालकमंत्र्यांनी घेतले दत्तक!
या उद्यानात "भारत आणि भारती" हे तीन वर्षाचे दोन सिंह नुकतेच 26 जानेवारीला गुजरात मधून आणण्यात आले आहेत. त्यांना वर्षभरासाठी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या पालनपोषणासाठी होणारा खर्च ॲड. आशिष शेलार वैयक्तिक रित्या करणार आहेत.
411 जणांना सुरक्षा कवच
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 400 वन मजूर असून ते उन, वारा , पाऊस याची तमा न बाळगता तसेच वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत गस्तीचे काम करतात. यातील बहूसंख्य हे आदिवासी बांधव आहेत.
तर मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी घुसल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी जाणारी 11 जणांची टीम असून या सगळ्यांचा प्राण्यांशी थेट संपर्क येतो. मात्र या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यात आलेला नाही, ही बाब मंत्री आशिष शेलार यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत निर्देश दिले व या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यास सांगितले. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
