मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मंत्री धनजंय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीवर आणि नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

सोलापूर : नामदेव शास्त्री हे महंत आहेत, ज्ञानेश्वरीचे प्रचंड मोठे विद्वान आहेत. स्वतःच्या नावापुढे न्यायाचार्य लावतात, नामदेव शास्त्रींसारखे लोकं राजकारणात येतं असतील तर आम्हाला प्रचंड आनंद आहे. पण, 2015 ला पंकजासाठी बंद असलेल्या गडाचे दरवाजे 2025 मध्ये उघडले कसे? हा प्रश्न माझ्या मनात आहे. गडावर राजकारण करायचं नाही हे त्यांनी म्हटलेलं. पण, आज महंत यांना सांगावं लागतंय की समाजाने यांना जवळ करावे. यानिमित्ताने राजकारणात आलाच आहात तर तुम्हाला फुलेही मिळतील काटेही मिळतील याची तयारी देखील त्यांना करावी लागेल, अशा परखड शब्दात प्रकाश महाजन (Prakash mahajan) यांनी बीड प्रकरण आणि महंत-मुंडे भेटीवर भाष्य केलं. तसेच, गोपीनाथ मुंडेंनी (Gopinath munde) मृत्यूपर्वी काही वर्षे अगोदर धनजंय मुंडेंना (Dhananjay munde) इशारा दिला, सांभाळू राहा पण ऐकलं नाही, अशी आठवण देखील महाजन यांनी करुन दिली. प्रकाश महाजन यांचे व गोपीनाथ मुंडेंचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे, त्यांना मुंडेंचं राजकारण जवळून माहिती होतं.
मंत्री धनजंय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीवर आणि नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातून, प्रकाश महाजन यांनीही स्पष्टपणे भूमिका मांडत महंतांना सवाल केले आहेत. आपण न्यायाचार्य आहात पण महिलांच्या बाबतीत वेगळा न्याय आणि पुरुषाच्या बाबतीत वेगळा न्याय का?. गडावर राजकारण होणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा तुम्ही घेतली होती, पण असं काय घडलं की भीष्मप्रतिज्ञा तुम्हाला तोडावी लागली. श्रीकृष्णाने देखील अत्यंत प्रिय व्यक्ती म्हणजे अर्जुनासाठी शस्त्र हाती घेतलं, असं काही आहे का की, तुमचा अत्यंत प्रिय कुणीतरी पडलाय आणि तुम्हाला शस्त्र हाती घ्यावा लागलं, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी नामदेव शास्त्रींना प्रश्न विचारले आहेत.
धनंजय मुंडेची मीडिया ट्रायल थांबली पाहिजे, काही पुरावे असतील तर ते न्यायालयाकडे, मुख्यमंत्र्यांकडे गेले पाहिजेत. मीडिया ट्रायल करून एखाद्याला एवढं लक्ष करणं हे मला पटत नाही. पण, या नैतिकेतून त्यांची सुटका नाही हेदेखील खरे आहे, जो भस्मासुर त्यांनी पोसला, त्या भस्मासुराने तुमच्या डोक्यावर आता हात ठेवला आहे. मरण्याच्या काही वर्षा अगोदर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी इशारा दिला होता, सांभाळून राहा पण ऐकलं नाही असे म्हणत प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडेंच्या आजच्या परिस्थितील ते स्वत:च कारणीभूत असल्याचे म्हटले.
न्याय दुर्बलासाठी नाही, तो सबलांसाठी
संत भगवान बाबांवर जेव्हा आरोप झाले, तेव्हा त्यांनी काय दिव्य केलं होतं हे तरी लक्षात घ्या, तेवढी हिंमत आहे का तुमची? या गोष्टीचं वाईट वाटतं की न्याय हा दुर्बलासाठी नसतो, नारीसाठी नसतो तर न्याय हा सबलासाठी असतो, पुरुषांसाठी असतो हे आजच्या या घटनेतून दिसतं, अशा शब्दात नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर प्रकाश महाजन यांनी परखड भाष्य केलं.
बीड हे रत्नांची खाण
मिडीयाला विनंती आहे, हे असलं बीड नका दाखवू, जागतिक खो को स्पर्धेत महिला गटाने नावं कमावलं, त्या संघाची कर्णधार ही केजची आहे, एकदा तीची मुलाखत दाखवा. हे असले आदर्श दाखवल्याने लोकं पुष्पाला आदर्श मानतायत, झूकेगा नही म्हणतात. बीडचा बिहार नाही, बिहार शरीफ होता. बीड ही तसंच आहे, बीड हे रत्नांची खाण आहे, ते बीड मीडियाने दाखवावे अशी विनंती प्रकाश महाजन यांनी केली.
हेही वाचा
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
