लसणाच्या दरात वाढ, प्रतिकिलो लसणाला मिळतोय 400 रुपयांचा दर
सध्या लसणाच्या दरात (Garlic Prices) चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या काही आठवड्यात देशातील किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 300 ते 400 रुपयांवर पोहोचले आहेत.
Garlic Prices : सध्या लसणाच्या दरात (Garlic Prices) चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या काही आठवड्यात देशातील किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 300 ते 400 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांच्या घरचे बजेट कोसळले आहे. त्याचवेळी घाऊक बाजारात लसणाची किंमत 150 ते 250 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे.
लसणाचे भाव का वाढत आहेत?
डाळी, तांदूळ आणि कांद्याच्या वाढत्या किमतींमुळं आधीच लोकांचे बजेट कोलमडले आहे. अशातच सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळं कांद्याच्या दरात घसरण होत आहे. मात्र, सध्या लसणाच्या भावात वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लसणाच्या किंमती वाढ होण्यामागं दोन कारणे आहेत. प्रथमत: यंदा खराब हवामानामुळे लसूण पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे.
अवकाळी पावसाचा लसूण पिकाला फटका
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश ही मुख्य लसूण उत्पादक राज्ये आहेत. येथील अवकाळी पावसाचा लसूण पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. यासोबतच खरीप पिकाच्या काढणीला उशीर झाल्यानं पुरवठा साखळीवरही विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम लसणाच्या दरावर दिसून येत आहे.
लसणाचे भाव किती दिवस वाढत राहणार?
जानेवारी अखेरपर्यंत किरकोळ बाजारात लसणाची किंमत प्रतिकिलो 250 ते 350 रुपयांच्या दरम्यान राहू शकते, अशी माहिती व्यापाऱ्यांनी सांगितली. अशा स्थितीत लसणाच्या वाढलेल्या दरातून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाही. यासोबतच जानेवारीनंतर किंमतीत काहीशी घसरण नक्कीच दिसून येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. परंतू, लसणाचे दर सामान्य पातळीवर येण्यासाठी मार्च महिना उजाडू शकतो.
भारतात 32 लाख टन लसूण पिकतो
भारतात सुमारे 32.7 लाख टन लसणाचे उत्पादन होते. भारतात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेशात होते. मात्र, चीनमध्ये उत्पादनात घट होऊनही ते जगात पहिल्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये दरवर्षी सुमारे 2 ते 25 दशलक्ष टन लसणाचे उत्पादन केले जाते, जरी दोन्ही देशांमध्ये बहुतेक लसणाचा वापर देशांतर्गत केला जातो.
जागतिक बाजारात भारताच्या लसणाचे दर काय?
भारतातील लसूण आकाराने चीनच्या लसूणपेक्षा किंचित लहान आहे. त्याच वेळी, त्याचा दर चीनपेक्षा खूपच कमी आहे. जागतिक बाजारपेठेत चिनी लसणाची किंमत 1250 डॉलर प्रति टन आहे, तर भारतीय लसणाची किंमत 450 ते 1000 डॉलर प्रति टन आहे. त्यामुळे भारत गरीब ते श्रीमंत देशांच्या गरजेनुसार लसणाचा दर्जा देण्यास सक्षम आहे. चिनी लसणाची मागणी बहुतांशी अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये आहे, तर भारत मलेशिया, थायलंड, नेपाळ आणि व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणावर लसूण निर्यात करतो.
महत्त्वाच्या बातम्या: