Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
beed news: बीडची बदनामी होत आहे. पाच-पंचवीस लोकांनी बीडची बदनामी करायचे काम केले आहे. सुप्रिया सुळेंची मस्साजोगमध्ये देवेंद्र फडणवीसांकडे मागणी,वाल्मिक कराडवर गंभीर आरोप

बीड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक सुसंस्कृत नेते आहेत. संतोष देशमुख यांचे कुटंबीय त्यांना भेटले तेव्हा त्यांना आठ दिवसांत न्याय मिळेल, अशी माझी अपेक्षा होती. राजकारण चालत राहतं, पण अशा घटनेनंतर नेतृत्त्वाने एक संदेश दिला पाहिजे. हे राज्य आता मी चालवतो, या राज्यात मी असली कुठलीही कृती सहन करणार नाही. हे प्रत्येक पोलिसाला कळाले पाहिजे, तो सिग्नल वरुन गेला पाहिजे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुल-आंबेडकरांच्या संस्कारानेच चालेल, हा संदेश गेला पाहिजे. मी महाराष्ट्रातील एक महिला म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटणार आहे. माझा पदर पुढे करणार आहे, त्यामध्ये माझ्या भावासाठी न्याय द्या, असे सांगणार आहे, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे, मेहबुब शेख यांनी मंगळवारी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती उघड केली. संतोष देशमुख हत्याप्रकरण खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांच्यामुळे उघड झाले. ते संसदेत उभे राहिले आणि त्यांनी भाषण केले. बजरंग सोनावणे आणि मी आठ दिवसांपूर्वी आम्ही अमित शाह यांना भेटून आलो. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, ते या विषयात जातीने लक्ष घालतील. आम्ही दोघांनी याचे फोटो टाकले नाहीत, काही बोललो नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने गृहमंत्र्यांना विनंती केली. यामध्ये पोलीस किंवा अधिकारी कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करु नका. महाराष्ट्राने तुम्हाला इतकं मोठं मतदान केलंय, न्याय मिळणार नसेल तर काय करायची सत्ता, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. मी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शब्द देते, मी कोणाला भेटणार नाही, तडजोड करणार नाही. जो कोणी याच्यामागे आहे, त्याला फाशी झाली पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
बीडमध्ये सगळी मस्ती आहे ना यांची, ही पैशांची आणि सत्तेची मस्ती उतरली पाहिजे. सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकत नाही. ही मस्ती सत्याने मोडून काढू. बीडमधील गुंडगिरी थांबली पाहिजे. बीडमधील महिलांना मोकळेपणाने फिरता आले पाहिजे. वाल्मिक कराड व्हिडिओ काढून पोलिसांना सांगतोय की मी येत आहे. याला पैशाची मस्ती आहे. ज्या वेळी मर्डर झाला त्या वेळी डीवायएसपी यांचे सीडीआर काढा, कृष्णा आंधळेचे सीडीआर मिळाले पाहिजेत. या देशात खंडणी सगळ्यात मोठा गुन्हा आहे. वाल्मिक कराडला ईडी कशी लागली नाही?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

