शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यमान आमदाराने लावलेल्या बॅनरवरून शरद पवार आणि तुतारी चिन्ह गायब झाले आहे.

NCP Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) एकामागे एका धक्के बसत आहेत. एका बाजूला ठाकरे सेनेचे माजी आमदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे मोठ्या संख्येने शिंदेसेनेत इनकमिंग सुरू असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group) विद्यमान आमदाराने लावलेल्या बॅनरवरून शरद पवार आणि त्यांची तुतारी गायब झाली आहे. या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मोहोळचे आमदार राजू खरे (Raju Khare) यांनी शिवजयंतीनिमित्त शिंदे सेनेचे भरत गोगावले यांना कार्यक्रमाला बोलावले आहे. यानिमित्त ठिकठिकाणी लागलेल्या डिजिटल आणि फ्लेक्स वरून शरद पवार आणि त्यांची तुतारी गायब होऊन त्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत शेठ गोगावले यांचे फोटो झळकले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का
मोहोळचे आमदार राजू खरे हे शरद पवार गटाचे आमदार असले तरी त्यांनी जाहीररित्या यापूर्वीही मी तुतारीवाला नसून कट्टर शिवसैनिक असल्याचे वक्तव्य भाषणातून केले होते. आता थेट त्यांच्या फ्लेक्स आणि बॅनरवरून शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची तुतारी गायब होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री भरत गोगावले यांचे फोटो मोहोळ आणि पंढरपूर भागात लागले आहेत. एका बाजूला ठाकरे सेनेचे माजी आमदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे मोठ्या संख्येने शिंदेसेनेत इनकमिंग सुरू असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यमान आमदारानेच अशा पद्धतीचे फलक लावत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे.
राजू खरेंच्या मनात चाललंय तरी काय?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राजू खरे यांनी चुकून मला तुतारी हाती घ्यावी लागली. मी तुमच्यासोबत 35 वर्षे होतो, असे वक्तव्य केले होते. यावेळी महाविकास आघाडीचे धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समोर पत्रकार आहेत, असे लक्षात आणून दिले होते. यानंतर आमदार खरे आपल्या विधानावर ठाम राहत पुढे पत्रकार असेल तरी असू द्या, असे विधान त्यांनी केले होते. आता राजू खरे यांच्या बॅनरवरून शरद पवारांना वगळल्याने राजू खरे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

