Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
Supreme Court Slams Ranveer Allahbadia: रणवीर अलाहाबादियाविरुद्ध देशाच्या विविध शहरांतून अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. अलीकडेच, युट्यूबरनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Supreme Court Slams Ranveer Allahbadia: आई-वडिलांबाबत अश्लील टिप्पणी करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे. रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयानं आपला पासपोर्ट पोलिसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी युट्यूबर समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह्य टिप्पणी केली होती. ज्यामुळे देशभरात खळबळ उडालेली. अशातच आता याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
रणवीर अलाहाबादियाविरुद्ध देशाच्या विविध शहरांतून अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. अलीकडेच, युट्यूबरनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्याच्याविरुद्धचे सर्व एफआयआर एकत्र करावेत, अशी विनंती करण्यात आली होती. तसेच, याप्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणीही रणवीरनं केली होती.
आता 18 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती एन. कोटेश्वर यांनी या प्रकरणी सुनावणी केली आहे. त्यांनी रणवीर अलाहाबादिया यांना कडक शब्दांत फटकारलं आणि असं भाष्य करताना त्यांना लाज वाटली पाहिजे असं म्हटलं आहे. मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे पुत्र वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयात रणवीर अलाहबादियाची बाजू मांडली.
रणवीर अलाहाबादिया यांचे वकील डॉ. अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितलं की, याचिकाकर्त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. जीभ कापण्यासाठी 5 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. एका माजी कुस्तीपटूनं म्हटलंय की, आपण कोणत्याही पक्षात भेटलो तरी, त्याला सोडता कामा नये. हे सर्व 10 सेकंदांच्या क्लिपसाठी. यावर न्यायालयानं कडक टिप्पणी केली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, "तुम्ही वापरलेल्या भाषेचा बचाव करताय का? त्यावर डॉ. अभिनव चंद्रचूड म्हणाले की, न्यायालयाचे अधिकारी म्हणून मला वापरल्या जाणाऱ्या भाषेचा तिरस्कार वाटतो. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं म्हटलं की, "तर मग अश्लीलतेचे मापदंड काय आहेत? समाजात काही स्वयं-विकसित मूल्ये आहेत आणि जेव्हा आपण त्या निकषांमध्ये वावरतो, त्यावेळी आपण जाणून घ्यायला हवं की, आपल्या भारतीय समाजाचे नियम काय आहेत?"
जर हे अश्लील नाही तर काय आहे? : न्यायमूर्ती
न्यायमूर्ती सूर्यकांत पुढे बोलताना म्हणाले की, "जर हे अश्लील नाही तर काय आहे? तुम्ही तुमचा अश्लीलपणा आणि असभ्यपणा कधीही दाखवू शकता... फक्त दोनच एफआयआर आहेत. एक मुंबईत आणि एक आसाममध्ये... स्वातंत्र्य हा वेगळा मुद्दा आहे. प्रत्येक बाबतीत तुम्हीच लक्ष्य असता आणि तुम्हीच त्यात सामील असता असं नाही. समजा 100 एफआयआर आहेत, तर तो म्हणू शकतो की, तो स्वतःचा बचाव करू शकत नाही."
अशा वर्तनाचा निषेध केला पाहिजे, बचाव नाही : न्यायमूर्ती
"एका एफआयआरमध्ये काही आरोप आहेत आणि दुसऱ्यामध्ये नाहीत. त्यानं अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांविरुद्ध अश्लील आणि घाणेरडी भाषा वापरली... त्यामुळे आरोप वेगळे आहेत... जर तुम्ही एका व्यक्तीला मारलं आणि दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला तर कलम 302 आणि 307 दोन्ही लागू होतील.", असं न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "अशा वर्तनाचा निषेध केला पाहिजे. फक्त तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून तुम्ही समाजाला हलक्यात घेऊ शकत नाही. जगात असा कोणी आहे का? ज्याला अशी भाषा आवडेल? ज्याच्या डोक्यात खूप काहीतरी वाईट चाललंय. आपण त्यांचा बचाव का करावा?"
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

