Tonga Tsunami : टोंगा समुद्रात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं भयंकर त्सुनामी; व्हिडीओ व्हायरल
Tonga Tsunami : शनिवारी संध्याकाळी झालेल्या प्रचंड स्फोटानंतर सॅटेलाइट इमेजेसमध्ये प्रशांत महासागरावर राख, वाफ आणि वायूचा जाड थर दिसून आला.

Tonga Tsunami : रविवारी पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर प्रशांत महासागराभोवती त्सुनामीचा धोका कमी होऊ लागला. परंतु अद्यापही टोंगा हे लहान बेट राखेच्या ढगांनी झाकून गेलेलं आहे. त्यामुळे टोंगातील नुकसानीचं मुल्यांकन करण्यासाठी न्यूझीलंडहून देखरेख पथकं टोंगासाठी रवाना होऊ शकली नाहीत.
शनिवारी संध्याकाळी झालेल्या प्रचंड स्फोटानंतर प्रशांत महासागरावर राख, वाफ आणि वायूचा जाड थर दिसून आला. उपग्रहामार्फत घेण्यात आलेल्या फोटोंमध्ये प्रशांत महासागरावरील थर स्पष्ट दिसून येत आहे. स्फोटाचा आवाज अलास्कापर्यंत दूरपर्यंत ऐकू येत होता. टोंगामध्ये समुद्राच्या भयानक लाटा किनाऱ्यावर येऊ लागल्या आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी उंच ठिकाणी पोहोचले. सोशल मीडियावर या त्सुनामीचं रौद्र रुप दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळं टोंगामध्ये इंटरनेट पूर्णपणे ठप्प झालं. जगभरातील लोक त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांची ख्याली खुशाली जाणून घेण्यासाठी अस्वस्थ होऊ लागले होते. इंटरनेट सेवा खंडीत झाल्यामुळं रविवारी दुपारपर्यंत सरकारच्या वेबसाइट आणि अन्य माध्यमांवर कोणतीही अपडेटेड माहिती देण्यात आलेली नव्हती.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी सांगितलं की, टोंगामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं अधिकृत वृत्त नाही. तसेच काही किनारी भाग आणि लहान बेटांशी अधिकारी आतापर्यंत संपर्क करू शकलेले नाहीत, असंही ते म्हणाले. "टोंगाशी संप्रेषण दुवे खूप मर्यादित आहेत. मला माहित आहे की, टोंगाचे लोक येथे खूप चिंतित आहेत," असंही आर्डर्न म्हणाले.
त्सुनामी म्हणजे काय?
परिसंस्थांमध्ये आकस्मिक बदल घडवून आणणाऱ्या विशाल सागरी लाटांना जपानी भाषेत त्सुनामी असं म्हणतात. सध्या हाच शब्द सर्वत्र प्रचलित आहे. समुद्राच्या तळभागावर भेगा पडल्यास त्या खळग्यात पाणी घुसते आणि त्या पाण्याचे स्थानांतरण होऊन प्रचंड लाटेची निर्मिती होते. यालाच त्सुनामी म्हटलं जातं. भूकंप, ज्वालामुखी अशा नैसर्गिक घटनांमुळे सागरतळावर भेगा पडल्यामुळे या लाटा निर्माण होतात.
त्सुनामीच्या लाटांचे स्वरूप समुद्रातील लाटांपेक्षा वेगळे असते. या लाटांची व्हेवलेंथ म्हणजे तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे सागरकिनाऱ्याकडे येणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि त्याची व्याप्ती ही इतर साधारण लाटांपेक्षा जास्त असते. त्सुनामीमुळे येणाऱ्या लाटा या अधिक वेगवान आणि मोठ्या असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Tsunami : अमेरिकेच्या पश्चिम किनारी प्रदेशाला त्सुनामीचा फटका बसण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा जारी
- न्यूझीलंडजवळच्या टोंगा समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक; जपानला त्सुनामीचा तडाखा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियालाही अलर्ट
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
