Tsunami : अमेरिकेच्या पश्चिम किनारी प्रदेशाला त्सुनामीचा फटका बसण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा जारी
अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणाऱ्या या त्सुनामीच्या लाटा दोन फूट उंचीच्या असतील अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबई : पॅसिफिक समुद्रातील टोंगा या ठिकाणी झालेल्या ज्वालामुखीमुळे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या त्सुनामीची शक्यता निर्माण झाली आहे. यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसने या त्सुनामीचा इशारा दिला असून याचा फटका कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेपासून ते आलास्काच्या अॅलेटियन बेटापर्यंत बसणार आहे. त्सुनामीच्या या लाटा साधारणपणे दोन फूट उंचीपर्यंतच्या असतील, त्यामुळे या प्रदेशाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या त्सुनामीमुळे जास्त काही नुकसान होणार नसलं तरी समुद्री बेटांना याचा काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या त्सुनामीमुळे हवाई बेटांवर काही प्रमाणात पुराची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे.
अमेरिकेप्रमाणे पॅसिफिक समुद्रातील न्यूझिलंड, फिजी, वनाऊटू, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या किनारी प्रदेशावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
#UPDATE Frightened Tongans fled to higher ground Saturday after a massive volcanic eruption that triggered tsunami warnings across the South Pacific, including the entire US West Coasthttps://t.co/xv9C71bo0O pic.twitter.com/CzI2KxGOfC
— AFP News Agency (@AFP) January 15, 2022
त्सुनामी म्हणजे काय?
परिसंस्थांमध्ये आकस्मिक बदल घडवून आणणाऱ्या विशाल सागरी लाटांना जपानी भाषेत त्सुनामी असं म्हणतात. सध्या हाच शब्द सर्वत्र प्रचलित आहे. समुद्राच्या तळभागावर भेगा पडल्यास त्या खळग्यात पाणी घुसते आणि त्या पाण्याचे स्थानांतरण होऊन प्रचंड लाटेची निर्मिती होते. यालाच त्सुनामी म्हटलं जातं. भूकंप, ज्वालामुखी अशा नैसर्गिक घटनांमुळे सागरतळावर भेगा पडल्यामुळे या लाटा निर्माण होतात.
त्सुनामीच्या लाटांचे स्वरूप समुद्रातील लाटांपेक्षा वेगळे असते. या लाटांची व्हेवलेंथ म्हणजे तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे सागरकिनाऱ्याकडे येणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि त्याची व्याप्ती ही इतर साधारण लाटांपेक्षा जास्त असते. त्सुनामीमुळे येणाऱ्या लाटा या अधिक वेगवान आणि मोठ्या असतात.
महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Update : कोरोनाची रुग्णसंख्या वाढली, गेल्या 24 तासात 42,462 रुग्णांची नोंद तर 23 जणांचा मृत्यू
- Indian Army Day 2022: नवा गणवेश, नवा जोश; भारतीय लष्कराला मिळाला कॉम्बॅट युनिफॉर्म
- डोक्यावर केळी, हातात पाटी; पुण्याचा केळेवाला सोशल मीडियावर व्हायरल