मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
हा आजार संसर्गजन्य नसल्याचे वारंवार प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी या आजाराचा वाढता प्रसार वेगाने होतोय. हा आजार गर्दीने आणि संसर्गाने होत असल्याची शंका येत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय.

Buldhana: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमने या आजारानं चांगलंच डोकं वर काढलं असून पुण्यासह राज्यभरात जीबीएस रुग्णांची संख्या 210हून अधिक झाली आहे. (GBS) अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले असले तरी GBS मुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 9 वर पोहोचलीय. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे वारंवार प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी या आजाराचा वाढता प्रसार वेगाने होतोय. हा आजार गर्दीने आणि संसर्गाने होत असल्याची शंका येत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरात लवकर राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करू असं केंद्रीय आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी सांगितलं. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला..
केंद्रीय आरोग्य विभाग आणि यंत्रणा या आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचेही जाधव यांनी सांगितले. त्यामुळे आता जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. बुलढाण्यात सैलानीबाबांची मोठी यात्रा असते. देशाच्या कानाकोपऱ्यात या यात्रेसाठी अनेक भाविक येतात. करोना काळात देशातील यात्रा, महोत्सवांवर निर्बंध होते. आता जीबीएसचा धोका वाढत असताना देशभरात जीबीएसचे रुग्ण सापडतायत.त्यामुळे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जीबीएसमुळे यात्रांवर निर्बंध येण्याची शक्यता बोलून दाखवली.
जीबीएसचा संसर्ग गर्दी व संसर्गामुळे?
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तत्परतेने काम करत आहोत.केंद्र शासन तसेच राज्याचे आरोग्य खातेही जीबीएसवर मात करण्यासाठी तयार असून पूर्ण व्यवस्था केली आहे.गर्दीमुळे जीबीएसचा संसर्ग होत असेल,तर संबंधित डॉक्टरांसह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यात्रांवरील निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल,असेही जाधव यांनी स्पष्ट केले. शिंदे गट भाजपात विलिन होईल, या खासदार राऊत यांच्या भाकिताची खिल्लीही त्यांनी उडवली.संजय राऊतांनी ठाकरे गट सांभाळावा असेही ते म्हणाले.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ स्वयंप्रतिकार (Auto immune) स्वरुपाचा विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच चेतासंस्थांवर (peripheralnervous system) हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा संसर्गजन्यरोग नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. याचे निश्चित कारण अज्ञात आहे. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग नवीन नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर तो विकसित होऊ शकतो. तसेच GBS ची इतर अनेक कारणे असतात. गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग वर्षभर आढळतो. साधारणपणे 1 लाख लोकांमध्ये एकजण या रोगाने ग्रस्त असतो. त्यामुळे, मुंबईतील मोठी रूग्णालये / वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर महिन्याला 'जीबीएस' चे काही रुग्ण उपचारासाठी येतात.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

