Latur News : गांधी विचारांचा गोडवा निर्माण करणाऱ्या उजेड गावात गांधी बाबाची यात्रा; 1952 पासून आजतगायात गावकरी जपताय समृद्ध वारसा
संपूर्ण भारत देश आज प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. मात्र उजेड या गावात गांधीजींच्या विचारांची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. ती 1952 पासून आजतागायत जपली जात असून येथील गावकरी हा समृद्ध वारसा आजही जपताय.

लातूर: संपूर्ण भारत देश आज प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. मात्र उजेड या गावात गांधीजींच्या (Mahatma Gandhi) विचारांची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. ती 1952 पासून आजतागायत जपली जातात. या गावात गांधीजींच्या विचारांचा उत्सव साजरा करत पाच दिवसाची यात्रा भरवली जाते. गांधी विचार घेऊन जाताना बरोबर 7000 किलो पेक्षा जास्त जिलेबी खाल्ली जात असून आजही येथील गावकरी हा समृद्ध वारसा जपत आहेत.
गांधी बाबाची यात्रा भरवणारे हे आहे लातूर (Latur News) जिल्ह्यातील उजेड गाव असून या गावाचे मूळ नाव हिसामाबाद आहे. याच गावात दोन दिवसात 7000 किलो पेक्षा जास्त जिलेबी फस्त केली जाते. अश्या अनेक कारणामुळे हे गाव नेहमीच चर्चेत असते..चला तर मग या गावचा समृद्ध इतिहास जाणून घेऊ.
गांधी विचारांचे 'उजेड'
गावामध्ये पिराची यात्रा भरवायची की हनुमानची यात्रा भरवायची यावरून वाद निर्माण होऊ लागले होते. दरम्यान गावातील काही सुजाण नागरिकांनी एकत्र आले आणि आपण गांधीबाबाची यात्रा सुरू करू, असा प्रस्ताव ठेवला. गावातील सर्व समाजातील लोकांनी एकमुखाने या निर्णयाला मान्यता दिली आणि दिवस ठरला 26 जानेवारी. महात्मा गांधीचा पुतळा बनवून आणण्यात आला. गावाच्या मुख्य चौकात तो पुतळा लावण्यात आला. रंगरंगोटी, पताका, संपूर्ण गावात रांगोळी काढण्यात आली होती. ग्रामदेवतेच्या यात्रेसारखी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. गांधीबाबाच्या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण असतं ते राष्ट्रगीताचं. 26 जानेवारीला सकाळी गांधी चौकातील गांधी बाबाच्या पुतळ्यासमोर सर्वजण एकत्र येतात. राष्ट्रध्वजाची मिरवणूक काढली जाते. या यात्रेत आरती ऐवजी राष्ट्रगीत गायले जाते. तर महात्मा गांधींना अपेक्षित असणार खेडेगाव उजेड मध्ये पाहायला मिळते. तात्कालीन गाव प्रमुख आणि जमीनदार असलेले चांद पटेल यांनी सर्वानुमते पुढाकार घेत या यात्रेला सुरुवात केली होती.
दरम्यान, सुरुवातीच्या वेळी यात्रेचे स्वरूप खूप वेगळे होते. गावातील प्रमुख असलेले चांद पटेल हे घोड्यावर बसून हातात तिरंगा ध्वज घेऊन प्रभात फेरीच्या सर्वात पुढे असत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्याने घेण्यात येत असत. तर यात्रेची सुरुवात एक जानेवारी पासूनच होत असे. मात्र बदलत्या काळात ही यात्रा पाच दिवसावर आली.
असे पडले गावाचे उजेड नाव
स्वात्रंत्रपूर्व काळात या भागात वीज नसताना जनरेटरद्वारे या गावात रात्री दिवे लावण्याचे काम पोलीस पाटील चांद पटेल यांनी केले होते. संपूर्ण गावात उजेड करण्यात आला होता. त्यावेळी पासून या गावाचे नाव हिसामाबाद ऐवजी उजेड पडले. संपूर्ण भारतात गांधी विचाराने प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने राहणारे हे गाव आहे. हिंदू-मुस्लिम आणि इतर धर्मीय लोक गावात अतिशय एकोप्याने राहतात. हे गाव गांधी विचाराचे केंद्र झाले आहे. मात्र याकडे गांधी विचाराच्या विचारवंत आणि सरकारचे कायमच दुर्लक्ष झाल्याची खंत गावकऱ्यांची आहे
तीन दिवसात तीस क्विंटल साखरेपासून तब्बल 7000 किलोची जिलेबी
कोणत्याही गावाची यात्रा म्हटल्यानंतर खेळणीची विविध वस्तूंची दुकाने आणि त्याबरोबर खाण्यापिण्याची चंगळ ही असतेच. तसेच उजेड या गावात ही पहावयास मिळते. मात्र येथील एक खासियत आहारात साखर नको म्हणणाऱ्यांना धडकी भरवणारी आहे. कारण तीन दिवसांमध्ये तब्बल तीस क्विंटल साखरेपासून 7000 किलोची जिलेबी इथे फस्त केली जाते. येथील मुख्य दोन हॉटेल आणि त्याचबरोबर अनेक स्टॉल मधून गांधीबाबाच्या यात्रेचा प्रसाद म्हणून जिलेबी खाल्ली आणि दिली जाते. दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात सात हजार किलो जिलेबी विकली जाते. येथील जिलबी एवढी प्रसिद्ध आहे की अरब देशात गेलेली येथील लोक पार्सल घेऊन जातात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
