रंगांचा वास येतो म्हणून चित्रकार दाम्पत्याला नोटीस, पुणे महापालिकेचा प्रताप
पुणे महापालिकेने चित्रकार दाम्पत्याला रंगांचा वास येत असल्याची नोटीस पाठवली. या दाम्पत्याच्या घरासमोर राहणाऱ्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर महापालिकेने तत्परता दाखवत नोटीस पाठवली. परंतु चूक लक्षात आल्यावर मनपाला ही नोटीस मागे घ्यावी लागली.

पुणे : 'पुणे तिथे काय उणे' असं म्हटलं जातं पण आता याच ओळींचा प्रत्यय यावा असा प्रताप खुद्द पुणे महापालिकेने केला आहे. पुण्यातील कर्वेनगर भागात राहणाऱ्या एका चित्रकार दाम्पत्याला नागरिकांच्या तक्रारीवरुन महापालिकेने रंगांचा वास येत असल्याची नोटीस पाठवली. या नोटीसविरोधात दाम्पत्याने बाजू मांडली तेव्हा मात्र महापालिकेला आपली चूक लक्षात आली आणि त्यानंतर आपली नोटीस मागे घेतली. मात्र या सगळ्या प्रकारात या दाम्पत्याला विनाकारण मानसिक त्रास सोसावा लागला.
अनामिक कूचन आणि कृष्णा कूचन असं या चित्रकार दाम्पत्याचं नाव आहे. दोघेही कलाकार असून पुण्यातल्या कर्वेनगर भागात भाड्याच्या घरात हे राहतात. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले आणि स्टुडिओतच आपले घर मांडले. पण समोर राहणाऱ्या एका कुटुंबाने रंगांचा वास येत असल्याची तक्रार पुणे महापालिकेकडे केली. कधी नव्हे तर महापालिकाही इतकी सतर्क झाली की तात्काळ त्यांनी कूचन यांच्या घरी पाहणीसाठी कर्मचारी पाठवले आणि त्यांना नोटीस ही पाठवली. सोबतच पंखा लावणे, व्यावसायिक काम घरात हलवण्याचा सल्लाही दिला.
अखेर या दाम्पत्याने जेव्हा या नोटीसविरोधात आवाज उठवला तेव्हा मात्र महापालिकेने नोटीस मागे घेतली. पण या सगळ्या प्रकारात त्यांचे कामाचे दोन महिने वाया गेले. चित्रकारांनी कुठे चित्र काढायचे हे महापालिका ठरवणार का असा सवाल त्यांनी विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
