Pune Koyta Gang : कोयता गॅंगचा म्होरक्या मैत्रिणीला भेटायला आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला...
पुण्याच्या स्वारगेट परिसरात दहशत माजवणाऱ्या सचिन माने टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. स्वारगेट, सहकारनगर आणि मार्केटयार्ड परिसरात माने टोळीची दहशत आहे.

Pune Koyta Gang : स्थानिक भागात वर्चस्व राहण्यासाठी (Pune Crime News) तसेच कोयते, कुऱ्हाड घेऊन दहशत राहावी यासाठी पुण्यातील अनेक भागात कोयता गँग सक्रिय आहेत. अशाच "माने" टोळीला पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले आणि त्यांच्याकडून कोयता, पालघन, कुऱ्हाड, तलवार असे हत्यार जप्त केले आहेत. माने हा मैत्रिणीला भेटायला आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मागील काही महिन्यांपासून पुण्यातील अनेक परिसरात रोज एक भाई आणि त्यांच्या टोळ्या तयार होताना दिसत आहेत. त्यांचं वय अवघं 18-25 वर्ष आहे. अंगावर एखादा टी शर्ट टाकायचा, फाटलेली पँट घालायची, खिशात रुमाल, तोंडावर मास्क आणि हातात कोयता, अशी ओळख या नवीन भाई लोकांची तयार झाली आहे. त्यामुळे पुण्यात नव्या भाईगिरीचा उदय झाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशाच एका घटनेत आता पुणे पोलिसांनी तब्बल एक-दोन नाही तर तब्बल 10 जणांना कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत निर्माण केल्या प्रकरणी अटक केली आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरात दहशत माजवणाऱ्या सचिन माने टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. स्वारगेट, सहकारनगर आणि मार्केटयार्ड परिसरात माने टोळीची दहशत आहे. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या, खंडणी यासारखे 11 गंभीर गुन्हे सुद्धा आहेत.
मैत्रिणीला भेटायला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला
सचिन माने हा मैत्रिणीला भेटण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ज्या दिवशी माने हा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी घोरपडी भागात येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. माने हा घोरपडी भागात आला तेव्हा त्याने कंबरेला एक कोयता बांधलेला होता. पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याच वेळी त्याने त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने पोलिसांवर वार केले. यात पोलीस कर्मचारी जखमी झाले मात्र शितफितीने पोलिसांनी मानेला पकडलंच. यानंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारांना देखील वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेतले. या सगळ्यांकडून कोयते, तलवार, कुऱ्हाड, पालघन असे हत्यार जप्त करण्यात आले आहेत.
पुण्यातली भाईगिरी काही नवीन नाही पण कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न सध्या अनेक महिन्यांपासून शहरातील मध्यवर्ती भागात पाहायला मिळत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा टोळक्यांना ठोकून काढणार असे सांगितले आहे. त्यामुळे आता तरी अशा गुन्हेगारांना खाकी पोलिसांचा वचक बसतो का हे? पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
