भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdev Shastri On Dhananjay Munde : धनंजय मुंडे हे भगवानगडावर दाखल झाल्यानंतर महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराजांनी त्यांना भक्कम पाठींबा दर्शविला

Namdev Shastri On Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) मागील दीड महिन्यापासून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर होत असलेले आरोप आणि त्यांच्या राजीनाम्याची होणारी मागणी होत असतानाच ते गुरुवारी भगवानगडावर दाखल झाले. धनंजय मुंडे यांनी संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन, महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांचे आशीर्वाद घेतले. आज शुक्रवारी (दि. 31) नामदेव शास्त्री महाराज यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना भक्कम पाठींबा दर्शविला. तसेच भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडे यांच्या हाताला सलाईन असल्याचा दावा देखील नामदेव शास्त्री महाराज यांनी केलाय.
नामदेव शास्त्री महाराज पत्रकार परिषदेत म्हणाले की, आमच्या दोघांची राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक विषयावर चर्चा झाली. त्यांच्या मानसिकतेचा आम्ही आढावा घेतला. सगळं समजून घेतल्यानंतर मला असे जाणवले की, इतक्या वर्षापासून ते आमच्या जवळ आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत. सगळ्या नेत्यांसोबत ते राहिलेले आहेत. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. त्यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे, असे त्यांनी म्हटले
जातीय सलोखा नष्ट होत चाललाय
धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर आमच्या समाजाचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या सातशे वर्षापासून जातीयवाद नसावा, या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीयवाद उफाळून आणला. संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले, असे मला वाटत आहे. जातीय सलोखा नष्ट होत चालला आहे, असेही नामदेव शास्त्री महाराज म्हणाले.
धनंजय मुंडे खंडणीवर जगणारे नेते नाहीत
ते पुढे म्हणाले की, भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीमागे आहे. जे गुन्हेगार असतील त्यांचा शोध सुरू आहे. ज्या लोकांनी हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली, हे मीडियाने का दाखवले नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांच्या गावातला बैठकीतला विषय होता आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत, गेल्या 53 दिवसापासून मिडिया ट्रायल सुरू आहे. या सगळ्याचा भयानक परिणाम झाला आहे. वारकरी संप्रदायात सुद्धा झाला आहे. जातीयवाद ज्यांना माहिती नाही त्यांना देखील जातीयवाद समजला आहे. राजकीय स्वार्थ आमच्या दृष्टीने क्षणिक आहे.
भगवानगड त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, तो त्यांचा खाजगी विषय आहे. मी सामाजिक स्तरावर बोलतो. ते गुन्हेगार नाहीत हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि भगवानगड त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. पक्षाच्या नेत्यांना सुद्धा याची जाणीव आहे, असे नामदेव शास्त्री महाराज यांनी यावेळी सांगितले.
धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन
धनंजय मुंडे यांना जाणून टार्गेट केले जात आहे का? असे विचारले असता नामदेव शास्त्री म्हणाले की, त्यांना शंभर टक्के जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. मी काल धनंजय मुंडे यांना बोललो की, आमच्या क्षेत्रात तुम्ही इतका त्रास सहन केला असता तर मोठे संत झाले असता. त्या इथे आले आहेत तरी त्यांच्या हाताला सलाईन लावलेले आहे. एखाद्या माणसाने किती सहन करावे? असा सवाल नामदेव शास्त्री महाराज यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
