Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : 36 वर्षीय हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवाशी होता. 21जानेवारीला तो पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. मात्र उपचारासाठी आला तेव्हापासून व्हेंटिलेटरवर होता.

Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसने पहिला रुग्ण दगावलाय. 36 वर्षीय हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवाशी होता. 21जानेवारीला तो पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. मात्र उपचारासाठी आला तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवर होता. गेली आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले, मात्र काल त्याने अखेरचा श्वास घेतला. शहरात आत्तापर्यंत जीबीएसचे 13 रुग्ण आढळलेत, त्यातील हा पहिला बळी ठरला.
दुसरीकडे,पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 130 वर पोहोचली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) ला आतापर्यंत केलेल्या चाचण्यांमध्ये पाण्यात कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळले नाहीत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आता या जीवाणूच्या स्वरूपाचे जनुकीय अनुवांशिकतेद्वारे विश्लेषण करणार आहे. यातून उद्रेकाची कारणे समोर येतील. हा जीवाणू किमान पाच रुग्णांच्या स्टूलच्या नमुन्यांमध्ये आढळून आला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) आता हे गूढ उकलण्यासाठी इतर मार्गांचा विचार करत आहे. दरम्यान, आणखी तीन प्रकरणांची पुष्टी झाल्याने जीबीएस रुग्णांची संख्या 130 झाली आहे. 20 रुग्ण अजूनही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.
पुण्यात जीबीएसने महिलेचा मृत्यू
दरम्यान, पुण्यातील 56 वर्षीय महिलेचा सरकारी ससून जनरल हॉस्पिटलमध्ये जीबीएसमुळे मृत्यू झाला होता. मृत्यूमुखी पडलेल्या इतर आजारांनीही ग्रासले होते. आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आतापर्यंत 130 संशयित जीबीएस रुग्ण आढळले आहेत. याशिवाय सोलापुरात आणखी एका रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू झाला होता.
सातारा जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) ची प्रकरणे नोंदवली जात आहेत. पुण्यानंतर आता काल (30 जानेवारी) साताऱ्यातही या आजाराचे चार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. सातारा जिल्ह्यात आढळून आलेले चार संशयित रुग्ण हे सर्व 15 वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी दिली. सातारा शासकीय रुग्णालयात दोन, खासगी रुग्णालयात एक आणि कराड येथील कृष्णा रुग्णालयात एक रुग्ण उपचार घेत आहेत. चारही मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीवर विभाग सातत्याने लक्ष ठेवून असल्याने घाबरण्याची गरज नाही, असेही म्हटले आहे.
जीबीएस रोग म्हणजे काय?
GBS ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपाय गंभीर कमजोरी, अतिसार इ. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
